एफडीएच्या कारभारासाठी जिल्ह्यात केवळ तीन अधिकारी
By Admin | Updated: September 9, 2014 23:08 IST2014-09-09T23:08:28+5:302014-09-09T23:08:28+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज पाहण्याकरिता जिल्ह्यात केवळ तीनच अधिकारी कार्यरत असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक कामकाजाकडे दुर्लक्ष होत

एफडीएच्या कारभारासाठी जिल्ह्यात केवळ तीन अधिकारी
अमरावती : अन्न व औषध प्रशासन विभागाचे कामकाज पाहण्याकरिता जिल्ह्यात केवळ तीनच अधिकारी कार्यरत असल्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्याचा व्याप दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेक समस्या तोंड वर काढत आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यातच लोकसंख्येच्या दृष्टीने लागणारे संसाधनसुध्दा वाढले आहे. त्यामुळे योग्य व परिपूर्ण अन्न पदार्थांच्या विक्रीमध्ये भेसळ वाढली आहे. भेसळयुक्त पदार्थामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. पाणी, अन्न पदार्थ व अन्य काही संसाधनामध्ये भेसळ वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. हा परिणाम जाणून घेण्यासाठी त्या-त्या व्यापारी प्रतिष्ठातील अन्न व औषधीत मोडणाऱ्या पदार्थाचे नमुने घेण्याचे कार्य अन्न व औषधी प्रशासन विभाग (एफडीए) करीत असते. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे परवाना नोंदणी प्रक्रिया, पाणी तपासणी, अन्न पदार्थाचे नमुने तपासणी, गुटखा कारवाई, असे कार्य करावे लागतात. या कामाच्या तुलनेत अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे मनुष्य बळ कमी आहे. त्यामुळे सेवेवर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. केवळ तीन अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील १४ तालुक्याचे काम पाहावे लागत असल्यामुळे कारवाईमध्ये पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. अधिकाअधिक ठिकाणी जाऊन अन्न व औषधीत मोडणाऱ्या पदार्थांची तपासणी करण्याची जबाबदारी या तीन अधिकाऱ्यांना येऊन पडली आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडे जिल्ह्यात कामकाज पाहण्याकरिता एक सहायक आयुक्त आहेत. त्यांनाच यवतमाळ येथील अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. या विभागाकडे दोन अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी जाणे या अधिकाऱ्यांना सहज शक्य होत नाही. त्यातच जुन्या प्रकरणातील खटले न्यायालय असल्यामुळे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना जाणे अनिवार्य असते. या सर्व कामांचा ताण अधिकाऱ्यांवर वाढला असून येथील रिक्त पदे भरणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)