जिल्ह्यात ५० रूग्णांमागे एकच परिचारिका
By Admin | Updated: May 11, 2014 22:48 IST2014-05-11T22:48:52+5:302014-05-11T22:48:52+5:30
रूग्णांची अहोरात्र सेवा करून त्यांना जीवदान देणार्या जिल्ह्याभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांचे कार्य कौतुकास्पद आहे.

जिल्ह्यात ५० रूग्णांमागे एकच परिचारिका
अमरावती : रूग्णांची अहोरात्र सेवा करून त्यांना जीवदान देणार्या जिल्ह्याभरातील शासकीय रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात परिचारिकांचे कार्य कौतुकास्पद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात १९५ परिचारीका आरोग्य सेवा पुरवित आहेत. ५० रूग्णांमागे १ परिचारिका सध्या कार्यरत असल्याने त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. सोमवार १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा. जागतिक परिचारिका दिनाला १९६५ सालापासून सुरूवात करण्यात आली. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा इंटरनॅशनल काऊंसिल आॅफ नर्स युनायटेड स्टेट यांनी हा दिन साजरा केला होता. त्यांनतर दरवर्षी एक नवीन उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे प्रयत्न जागतिक परिचारिका संघटना व जागतिक आरोग्य संघटनेच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. आरोग्य सेवेतील बदलांचा एक प्रभावी घटक म्हणून परिचारीकांकडे बघितले जाते. परिचारिका रुग्णालयांमध्ये रूग्णांची फक्त सेवाच करीत नाहीत तर ही सेवा देताना येणार्या अडचणी व सकंटांवर कष्टाने मात करतात. रूग्णांना आरोग्य सेवा पुरविताना कुठलीही हयगय होणार नाही, याची काळजी परिचारिका सातत्याने घेतात. त्यामुळे डॉक्टरांनंतर परिचारिकांचे कार्यच महत्त्वाचे ठरते. आरोग्य सेवेच्या कार्यात हातभार लावणार्या कर्मचार्यांकडे लक्ष पुरविण्यासोबतच आरोग्य सेवेबाबत संपूर्ण माहिती वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य परिचारिकाच करतात. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, टीबी हॉस्पिटल व उपजिल्हा रुग्णालयांत परिचारीका आपले कार्य मनोभावे करताना आढळतात. विविध शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो रुग्ण उपचार घेतात. रुग्णांची वाढती संख्या पाहता ५०० रुग्णांची आवश्यकता जिल्ह्यातील रुग्णालयाना भासत आहे.त्याकरीता शासनाकडे प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे.