दक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST2021-09-09T04:18:08+5:302021-09-09T04:18:08+5:30

अमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. ...

Only if vigilance is maintained will there be no time to impose strict restrictions again | दक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

दक्षता पाळली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

अमरावती : नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे गणेशोत्सव आदी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये. केरळमध्ये रोज हजारो नवे रुग्ण आढळत असून, हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे दक्षता पाळली गेली तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी दिला. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन करण्याचे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

अमेरिका, चीन आदी देशांत तिसरी लाट उदभवली असून, केरळमध्येही रोज नवे हजारो रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर आपल्याला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. तिसऱ्या लाटेच्या सामन्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे; पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी उत्सवकाळातही दक्षतेचा विसर पडता कामा नये.

आरोग्याची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तरच पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. आपण सर्वांनी मिळून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करायला हवे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन व्हावे. गर्दी व सार्वजनिक कार्यक्रम टाळावे असेही पालकमंत्री म्हणाल्या.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. आता तो रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी दक्षता नियम पालनाची व स्वयंशिस्तिची गरज आहे. त्यामुळे सर्वानी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Web Title: Only if vigilance is maintained will there be no time to impose strict restrictions again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.