जिल्ह्यात शिक्षकांसाठी प्रथमच आॅनलाईन प्रशिक्षण
By Admin | Updated: May 2, 2015 00:21 IST2015-05-02T00:21:15+5:302015-05-02T00:21:15+5:30
शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यात. निकालही हाती आले आहे.

जिल्ह्यात शिक्षकांसाठी प्रथमच आॅनलाईन प्रशिक्षण
अंमलबजावणी : २७ एप्रिल ते ४ जुलैपर्यंत प्रशिक्षण
अमरावती : शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यात. निकालही हाती आले आहे. मुले उन्हाळी सुटीच्या मुडमध्ये आहेत. मात्र ७ एप्रिलपासून शिक्षकांसाठी शाळा सुरु झाली आहे. राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषदेतर्फे पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकासंदर्भात यंदा प्रथमच अमरावतीसह राज्यभरातील सर्व शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. आॅनलाईन स्वरुपातील प्रशिक्षणाच्या या पहिल्याच प्रयोगासाठी शिक्षण विभागाने तयारी केले आहे.
शिक्षकांना तीन टप्यात हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मराठी दुसऱ्या टप्यात उर्दू, इंग्रजी माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. २७ एप्रिल ते ४ जुलै असा आॅनलाईन प्रशिक्षणाचा कालावधी आहे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे जबाबदारी आहे. एकही शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे.
गटसाधन केंद्राच्या माध्यमातून तालुका स्तरापासून सुसज्ज प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता संवर्धनासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत शालेय, सहशालेय विविध उपक्रम राबविले जातात. त्यानुसार शिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रम विकसन विभागातर्फे राज्याच्या प्रचलीत अभ्यासक्रम पुनर्रचित करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. राज्य शासनाने त्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार जून २०१३ पासून टप्याटप्याने अंमलबजावणी पहिलीपासून सुरु झाली. गतवर्षी तिसरी चौथीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. २०१५-१६ पासून पाचवीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. तशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
या पुनर्रचित अभ्यासक्रमासंदर्भात पहिल्यांदाच अमरावतीसह राज्यात एकाचवेळी ५० हजार प्राथमिक शिक्षकांना व्हर्च्युअल क्लासरुम यंत्रणेच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. पूर्वी असे प्रशिक्षण राज्य, जिल्हा, तालुकास्तरीय होत होते. त्यात वेळ पैसा मनुष्यबळाचा मोठा वापर करावा लागे. त्यामुळे आता गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर योग्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पहिल्यांदाच एकाच वेळी सर्व शिक्षकांना आॅनलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास प्रत्येक केंद्रात डीव्हीडी साधन व्यक्ती सुलभकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- पंडित पंडागळे,
उपशिक्षणाधिकारी प्राथमिक.