रेल्वेचे जनरल तिकिट मिळणार आॅनलाईन
By Admin | Updated: November 17, 2016 00:19 IST2016-11-17T00:19:02+5:302016-11-17T00:19:02+5:30
रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिट आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता प्रवाशांना जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची भानगड संपुष्टात आली आहे.

रेल्वेचे जनरल तिकिट मिळणार आॅनलाईन
प्रवाशांना दिलासा : रांगेत उभे राहण्याची भानगड संपली
अमरावती : रेल्वे प्रशासनाने जनरल तिकिट आॅनलाईन देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता प्रवाशांना जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची भानगड संपुष्टात आली आहे. हा निर्णय रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा आहे.
रेल्वे गाड्यात आरक्षण मिळविणे कठीण झाले आहे. अशातच जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची कटकट ही नित्याचीच बाब झाली असताना आता जनरल तिकिट हे आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. यापूर्वी रेल्वे गाड्यांचे जनरल तिकिट हे रेल्वेच्या खासगी केंद्रावर मिळायचे. परंतु आता खासगी ई- वॉलेटवर उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवाशांना एका क्लिकवर जनरल तिकिट मिळेल. परिणामी रेल्वे स्थानकावर तिकिटांसाठी पुर्वापार दिसणाऱ्या लांबलचक रांगा दिसेनासा होतील. दरदिवसाला रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. अशातच जनरल तिकिट मिळविण्यासाठी लांबलचक रांगामुळे बऱ्याचदा प्रवाशांना गाड्या सुटण्याचा प्रसंग ओढवला आहे. जनरल तिकिट मिळविण्यासाठी रांगामध्ये बाचाबाची, वाद होण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. मात्र जनरल तिकिट आॅनलाईन मिळत असल्यामुळे सामान्य प्रवाशांची डोकेदुखी दूर होणार आहे. जनरल तिकिट आॅनलाईन देण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रेल्वेच्या खासगी तिकिट केंद्रावर परिणाम जाणवेल, यात दुमत नाही. काही मोबाईल कंपन्या, पेटीएमसारख्या खासगी ई- वालेटचा वापर करुन जनरल तिकिट आॅनलाईन काढता येणार आहे.
आॅनलाईन जनरल तिकिट ही सुविधा प्रायोगिक तत्वावर काही रेल्वे स्थानकांवर सुरु होणार आहे. याबाबत रेल्वेचे आदेश प्राप्त होताच ही सुविधा लागू होईल.
- व्हि. डी. कुंभारे
वाणिज्य निरिक्षक, बडनेरा