आरटीईसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:14 IST2021-02-09T04:14:36+5:302021-02-09T04:14:36+5:30
अमरावती : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ...

आरटीईसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रिया आजपासून
अमरावती : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ९ फेब्रुवारीपासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होत आहे. हा मुहूर्त काढण्यात आला असला तरी दुसरीकडे अद्यापही शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी शाळांची शंभर टक्के नोंदणी झाली नसल्याने ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू होणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी यंदाही एकच सोडत निघणार आहे. आर्थिक दुर्बल तसेच वंचित प्रवर्गातील पाल्यांसाठी नर्सरी आणि पहिल्या वर्गात २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ३० जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, पुन्हा याकरिता ८ फेब्रुवारी अशी मुदतवाढ देण्यात आली होती. अशातच आता ही मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आरटीईच्या राखीव जागांसाठी आता पालकांना नियोजित वेळापत्रकानुसार मंगळवारपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करता येणार आहेत.
बॉक्स
असे आहे वेळापत्रक
८ फेब्रुवारी - शाळा नोंदणी
९ ते २६ फेब्रुवारी - प्रवेश अर्ज
५ ते ६ मार्च - ऑनलाइन सोडत
९ ते २६ मार्च - प्रवेश निश्चिती
२७ मार्च ते ६ एप्रिल - प्रतीक्षा यादी पहिला टप्पा
१२ ते १९ एप्रिल - दुसरी प्रतीक्षा यादी