कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा; भाव नीचांकीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:17 IST2018-05-26T22:16:53+5:302018-05-26T22:17:25+5:30

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा; भाव नीचांकीला
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहेत. पांढºया कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी २००, तर जास्तीत जास्त ६०० रुपये भाव शनिवारी मिळाला.
शेतकऱ्यांच्या लाल व पांढºया कांद्याला चार ते सहा रुपये भाव मिळत आहेत. तर हाच कांदा किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर तो जेव्हा ग्राहकांना विकला जातो, तो पंधरा ते वीस रुपये जातो. फळ व भाजी बाजारातून माहिती घेतली असता, पांढऱ्या कांद्याची आवक ४६५ क्विंटल होती. कमीत कमी २०० रुपये क्विंटलमागे भाव मिळाला, तर जास्तात जास्त ६०० रुपये भाव मिळाला, तर लाल कांद्याची आवक २४५ क्विंटल झाली. या कांद्यालाही भाव नसून कमीत कमी ३०० रूपये क्विंटल ते जास्तीत जास्त ५०० रुपये क्विंटल एवढा भाव मिळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा काढणे अवगळ झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
सकाळी हर्रास झाल्यानंतर खासगी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी कृत्रिम भाववाढ केली आहे. मात्र, जो शेतकरी शेतात राबराब राबून शेती उत्पादन काढतो, त्याला भाजीपाल्याला उत्तम भाव मिळविण्यात अपयश येत आहे. पिकाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने पाणी आणले आहे. कांद्याच्या उत्पादन खर्चामध्ये क्विंटलमागे खर्च जास्त होत असल्याने कांद्याचे पिक घ्यावे की नाही, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे.