अमरावती : पोलीस आयुक्तालयांतर्गत सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ६० ग्रामपंचायतींत शुक्रवारी मतदान प्रकिया पार पडणार आहे. त्याकरिता ८१ इमारतींमध्ये २२६ बुथ निश्चित केले असून, निवडणुकीत एक हजार पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुणीही नियमांचे उल्लंघन करू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले.
शहर हद्दीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता पोलीस आयुक्त आरती सिंह, तीन डीसीपी यांच्या मार्गदर्शनात तीन सहायक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, ४१ सहायक पोलीस उपनिरीक्षक,६०४ पोलीस अंमलदार, १२५ सैनिक, २ प्लाटून दंगा नियंत्रण पथक, १ जलद प्रतिसाद पथक कर्तव्यावर तैनात केले आहे. मतदान केंद्रानिहाय पोलिसांची गस्त तसेच पोलीस सेक्टर पेट्रोलिंगची आखणीसुद्धा करण्यात आली आहे.
बॉक्स
तरुणांनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने तरुणांनी सक्रिय होताना कुठल्याही भूलथापांना तसेच प्रलोभनाला बळी पडू नये, स्थानिक पातळीवर कोणत्याही अनुचित प्रकार किंवा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. युवकावर दाखल गुन्ह्यांची नोंद ही पोलीस रेकॉर्डवर येते. दाखल गुन्ह्याची माहिती ही चारित्र्य प्रमाणपत्रावर नोंद होत असल्याने भविष्यात चांगल्या संधीपासून युवकांना वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. म्हणून कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनाही पोलिसांनी केले.
बॉक्स:
मास्कचा वापर करणे अनिवार्य
जिल्ह्यात भयमुक्त वातावरण असून नागरिकांनी स्वेच्छेने मोठ्या प्रमाणात मतदान करावे, कोविड १९ चा धोका अद्यापही टळलेला नाही. नागरिकांनी मतदान करताना मतदान केंद्रावर गर्दी टाळून शारीरिक अंतर ठेवून मास्कचा वापर करावा, असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केले.
बॉक्स
सोशल मीडियावर सायबर पोलिसांची नजर
ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणत्याही व्यक्तींनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने परिस्थिती निर्माण केल्यास त्याची गय केली जाणार नाही. अशा सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या. तसेच सोशल मीडियावरसुद्धा सायबर पोलिसांची नजर असून आक्षेपार्ह पोस्ट, संदेश निर्मित करणे, प्रसारित करणे, पुढे पाठविणे टाळावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.