अर्थसंकल्पात शहराच्या वाट्याला एकच प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:07 IST2017-03-19T00:07:17+5:302017-03-19T00:07:17+5:30
कृषी क्षेत्रावर करण्यात आलेली भरीव तरतूद, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट व्हिलेजची घोषणा...

अर्थसंकल्पात शहराच्या वाट्याला एकच प्रकल्प
बेलोरा विमानतळासाठी निधी : शहरात सीसीटीव्ही प्रकल्प राबविणार
अमरावती : कृषी क्षेत्रावर करण्यात आलेली भरीव तरतूद, स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट व्हिलेजची घोषणा आणि स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी कोट्यवधींची तरतूद, ही राज्याच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये म्हणावी लागेल.
या अर्थसंकल्पात अमरावतीच्या वाट्याला बेलोरा विमानतळासाठी कोट्यवधींचा निधी तथा सीसीटीव्ही प्रकल्प आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अपेक्षित असताना ती न झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया एकीकडे उमटली आहे, तर दुसरीकडे भाजपसह अन्य काही पक्ष, सामाजिक संघटना तथा उद्योग क्षेत्रातून त्यासाठी समतोल अर्थसंकल्प अशी प्रतिक्रिया उमटली आहे. शेतीपूरक व्यवसायाभिमुख आणि राज्याला विकासाच्या वाटेवर नेणारा तर दुसरीकडे प्रचंड निराशावादी अशी टीकाही त्यावर झाली. त्यातील या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया अशा आहेत. (प्रतिनिधी)