परेड ग्राऊंडसाठी एक महिन्याचा अल्टिमेटम, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By Admin | Updated: May 12, 2015 00:07 IST2015-05-12T00:07:06+5:302015-05-12T00:07:06+5:30
‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या जुळ्या शहरातील विकासात्मक कामांसोबत रखडलेल्या योजना व परेड ग्राऊंड विकासासाठी एक ....

परेड ग्राऊंडसाठी एक महिन्याचा अल्टिमेटम, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
विकासावर चर्चा : पालकमंत्री पोटेंची अचलपुरात आढावा बैठक, अतिक्रमणासाठी एक महिन्यांचा अवधी, घरकुलावर खडाजंगी
नरेंद्र जावरे अचलपूर
‘अ’ वर्ग नगरपरिषद असलेल्या जुळ्या शहरातील विकासात्मक कामांसोबत रखडलेल्या योजना व परेड ग्राऊंड विकासासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम्, शहरातील अतिक्रमणासाठी एकवाक्यतेचा निर्णय, चंद्रभागेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न, घरकूल योजनेवर मुख्याधिकारी नगरसेवकांतील शाब्दिक खडाजंगीने पहिलीच आढावा बैठक पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली.
दीड लाखांवर लोकसंख्या असलेल्या परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराचा विकास आणि मूलभूत गरजांसह कार्यान्वित काही योजनांचा एकंदर आढावा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी नगरपालिका सभागृहात घेतला. याचवेळी नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी, उपाध्यक्ष गणी, मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, नगरपरिषद सभापती, नगरसेवक व तालुकास्तरीय सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अचलपूर शहरातील वाढते अतिक्रमण करण्यासाठी नगरसेवकांनी थेट पालकमंत्र्यांना साकडे घातले. यावर आपण एका दिवसात १० ते १२ जेसीबी लावून अतिक्रमण काढू. परंतु यादरम्यान एकाही नगरसेवकाचा फोन आपणास किंवा अधिकाऱ्याला यायला नको, अशी तंबी देत यासाठी एक महिन्याचा अवधी पालकमंत्र्यांनी संबंधित नगरसेवकांना दिला तर अतिक्रमण कुठले आहे याची पर्वा न करता सर्वच ठिकाणी बुलडोजर चालविला जाणार आहे, तशी मानसिक तयारी ठेवण्याचा सबुरीचा सल्ला पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
२५ शाळांचे छत जीर्णावस्थेत
अचलपूर नगरपरिषदेंतर्गत असलेल्या शाळांचे छत जीर्ण झाले आहे. २५ शाळांचे छत वादळवाऱ्यात कधीही कोसळू शकते. त्यात मोठी घटना घडू शकते. विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याचे पाणी, मुत्रीघर आदी सुविधा उपलब्ध नसल्याचे शिक्षण सभापती शीला महल्ले यांनी बैठकीत सांगितले तर इतर शाळाप्रमाणेच नगरपालिका शाळेचा दर्जा रहावा, विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी महल्ले यांनी केली. न. प. शाळेत केवळ गोरगरीबांचीच मुलेच आज शिकत असल्याने त्यावर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. येथील एकमेव तंत्रशिक्षण महाविद्यालयाची स्थिती गंभीर असून शिक्षकांना वेतन देण्यासाठी पालिका कमकुवत पडत असल्याने शासनातर्फे निधी देण्याची मागणी करण्यात आली.
पालकमंत्री म्हणाले, गुडेवारांचे मार्गदर्शन घ्या
आढावा बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्याधिकारी धनंजय जावळीकरविरुद्ध नगरसेवकांनी तक्रारी करीत रोष व्यक्त केला. त्यावर पालकमंत्र्यांनी त्यांचे कान उपटत समन्वयातून विकास करण्याचे व नगरसेवकांना सोबत घेण्याचे आदेश दिले. अधिनस्थ अधिकारी व कर्मचारी ऐकत नसेल तर अमरावतीत जाऊन मनपा आयुक्त गुडेवारांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्लाही पालकमंत्र्यांनी जावळीकरांना दिला.
घरकुलावर खडाजंगी
अचलपूर-परतवाडा शहरातील गरीब वस्त्यांमध्ये घरकूल योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळत नसल्याची ओरड उपस्थित नगरसेवकांनी यावेळी केली. पहिल्या टप्प्यात ९६५ व दुसऱ्या टप्प्यात ११६५ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यासाठी एपीएल व बीपीएलमधील हे घरकूल होते. त्यातील ६०० घरकूल पूर्ण झाले. त्यावरील १० कोटी रूपयांचा निधी संपला. निधी नसल्याने उर्वरित घरकुलांचे काम थांबल्याचे यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी निधी भरपूर उपलब्ध असून आठ दिवसांत उपलब्ध करून देण्याचे ठोस आश्वासन दिले. खोटी अफवा नागरिकांमध्ये न पसरविता राज्यात ५० लक्ष घरकुलांचे उद्दीष्ट असताना जिल्ह्यात अचलपूर सर्वात मागे असल्याचे पोटे म्हणाले. यावर त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले. सर्व प्रस्ताव तत्काळ मंजूर करा व जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल थांबली असल्यास तत्काळ कळविण्याचे सांगितले. घरकुलावर नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पालकमंत्र्यांनी त्यात मध्यस्थी केली.
मोजकेच नगरसेवक अन् जहीर बॉस शेर
अचलपूर नगरपरिषद सभागृहात ४० नगरसेवक असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या आढावा बैठकीला मोठ्या प्रमाणात महिला नगरसेविका अनुपस्थित होत्या. काहींनी पतींना प्रतिनिधी म्हणून पाठविल्याची चर्चा रंगली तर रूपेश ढेपे, ल. ज. दीक्षित, जहीरभाई, नितीन डकरे, प्रफुल्ल महाजन यांच्यासह काही दोन-चार नगरसेवकच बोलताना दिसले. आपल्या तक्रारीत नेहमीप्रमाणे सभागृहात नगरसेवक जहीरभाई यांनी उर्दूत एक शायरीसुद्धा बोलून दाखविली
चंद्रभागा पाणीपुरवठ्यात भ्रष्टाचार
जुळ्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास ४० कोटी रूपयांची पाणीपुरवठा मागील दहा वर्षांपासून संथगतीने कार्य होत आहे. चंद्रभागा पाणी पुरवठा योजना जन्म घेताच म्हातारी झाली. त्यावर खर्च झालेल्या कोट्यवधी रूपयांच्या निधीची चौकशी करण्याची एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली. गोंडवाना इंजिनिअरिंग कंपनीला सदर कामाचा कंत्राट देण्यात आला. संबंधित कंपनीने काम रखडून ठेवल्याने त्यावर कारवाईचे आदेश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. यू. आय. डी. पी. योजनेंतर्गत असलेल्या या पाणीपुरवठा योजनेत जलशुद्धीकरण आदी योजना गुरुत्वाकर्षणावर आहे, हे विशेष. तर दुसरीकडे सदर योजना पालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याने ती पाणी पुरवठा विभागाकडे हस्तांतरित करण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
आठवडीबाजार गाळ्यात विकेट पडणार
परतवाडा शहरातील आठवडी बाजारात भव्य व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. बीओटी तत्त्वावरील ३९२ घरकूल असून दोनशेवर दुकाने विकण्यात आली आहेत. त्यामध्ये संबंधित कंत्राटदाराने खोटे अॅग्रीमेंट करून दुकाने विकल्याचा गंभीर मुद्दा पालकमंत्र्यांपुढे मांडण्यात आला. यावर संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश देत संबंधितांवर दोषी आढळताच कारवाईचे संकेत दिले. यामुळे पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. दोन लाखांची खरेदी दाखवून ८ ते १० लक्ष रूपयांत प्रत्येकी दुकान विकले जात असल्याचा गंभीर मुद्दा मांडण्यात आला. यासोबत रेनवॉटर हॉर्वेस्टिंग, परतवाड्यातील रस्ता चौपदरीकरणाच्या कामाची गती वाढविण्याचे आदेश उपस्थित सा. बां. विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
परेड ग्राऊंडवर वन डे मॅच होणार
परतवाडा शहरातील दहा हेक्टर जागेवर परेड ग्राऊंड आहे. गणराज्यदिनी येथे पथसंचलन आणि शालेय सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. मूळत: महसूल विभागाची ही जमीन २० वर्षांपूर्वी नगरपरिषदेला हस्तांतरित करण्यात आली आहे. येथे भव्य क्रीडांगण, व्यापारी संकुल तयार करण्यासोबत मेळघाटचा संदर्भ देत येथील भव्यदिव्य मैदानावर एक दिवसीय क्रिकेट सामना खेळला गेला पाहिजे, ही आपली संकल्पना असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा विकासाचे नियोजन करताना सर्वच तालुक्याला महत्त्वपूर्ण स्थान दिल्याचे स्पष्ट जाणवत होते. परंतु परडे ग्राऊंड विकासासाठी नगरपरिषद नाहरकत प्रमाणपत्र देत नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी थेट न. प. च्या आढावा बैठकीतच एक महिन्याचा अल्टिमेटम देऊन टाकला. त्यामुळे उपस्थित नगरसेवकांच्या भुवईया उंचावण्यासोबत त्यांची शहर विकासाची उदासीनता दिसून आली. परेड ग्राऊंडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने ते हटविण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांचा सर्वाधिक आग्रह परेड ग्राऊंडसाठी दिसल्याने परतवाडा शहरात एक दिवसीय क्रिकेट सामना रंगणार आहे. दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या अल्टिमेटमला नगरसेवक किती प्रतिसाद देतात यावर नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत.
बिच्छन विकास
प्रकल्पाची पाहणी
परतवाडा शहरातून वाहणाऱ्या बिच्छन नदी विकास प्रकल्प स्थळाची पाहणी पालकमंत्री पोटे यांनी केली. यावेळी दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी, राजेश उभाड, आार्किटेक्ट अमित अग्रवाल, गजानन कोल्हे, रूपेश ढेपे आदी उपस्थित होते. २०० कोटी रूपये खर्चाचा प्रकल्प शहराचे सौंदर्यीकरण, बेरोजगारांना रोजगार वाहतुकीचा अडथळा दूर करणारा ठरणार आहे. त्याचे सादरीकरण पालिका सभागृहात यावेळी करण्यात आले.
म्हणे आयपीएल!
घरकूल रमाई आवास योजना दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांसाठी असताना एपीएल व बीपीएलऐवजी उपस्थित नगरसेवकांनी चक्क आयपीएल योजनेतूनच घरकुलाची मागणी केली. नगरपालिकेची आढावा बैठक जणू क्रिकेटचे मैदान झाल्याचेच चित्र व आयपीएलमधून घरकुलांची मागणी, खडाजंगीत यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.