वऱ्हाडातील एक लाख शेतकरी सावकाराच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:11 IST2021-07-26T04:11:56+5:302021-07-26T04:11:56+5:30

गजानन मोहोड अमरावती : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांमागे अस्मानी अन् सुलतानी संकट हात धुवून लागले आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा पीककर्ज ...

One lakh farmers in Varada at the door of the lender | वऱ्हाडातील एक लाख शेतकरी सावकाराच्या दारी

वऱ्हाडातील एक लाख शेतकरी सावकाराच्या दारी

गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांमागे अस्मानी अन् सुलतानी संकट हात धुवून लागले आहे. यात राष्ट्रीयीकृत बँकांद्वारा पीककर्ज वाटपाचा हात आखडता घेतल्याने शेतकऱ्यांना सावकारांच्या दारी जावे लागत आहे. आतापर्यंत ९८८ सावकारांद्वारा एक लाख ९२६ शेतकऱ्यांना ९७ कोटी ४१ लाख २१ हजारांचे कर्जवाटप केलेले आहे. अवैध सावकारांद्वारा किमान ५०० कोटीवर कर्जवाटप केल्याची शक्यता सहकार सूत्रांनी वर्तविली आहे.

शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या मागे नापिकी व नैसर्गिक आपत्तीचे सत्र सुरूच आहे. सात-बारा कोरा झाल्यावर ५० टक्के शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. त्यामुळे बँकांद्वारा कर्ज नाकारले जात आहे. याशिवाय राष्ट्रीयीकृत बँकांचा कर्जवाटपाचा टक्का कमी आहे. अशा परिस्थितीत पेरणी, मुला-मुलीचे शिक्षण व उदरनिर्वाह आदी विवंचनेमुळे शेतकऱ्यांना सावकारांची पायरी ओलांडावी लागत आहेत.

विभागातील जिल्हा सहकारी बँकांनी उद्दिष्टांच्या ८६ टक्के कर्जवाटप केले असताना राष्ट्रीयीकृत बँकाचे वाटप मात्र, ४४ टक्क्यांवरच रखडले आहे.

याव्यतिरिक्त बिगर शेतीसाठीही एक लाख ४६,९५१ नागरिकांनी १६७ कोटी ४९ लाख ४२ हजारांचे कर्ज परवानाधारक सावकारांकडून घेतले आहे. यात शेतकरी कर्जदारदेखील आहेत. सर्वाधिक अकोला जिल्ह्यात एक लाख ३३ हजार ७८७ व्यक्तींनी १४४ कोटी ३८ लाख ८९ हजारांचे कर्ज परवानाधारक सावकारांकडून घेतले आहे. किमान २० ते २५ टक्के कर्ज अवैध सावकारांकडून वाटल्याचा अंदाज आहे. या नियमबाह्य कर्जवाटपा विषयीची तक्रार जोवर होत नाही, तोवर सहकार विभागाद्वारा कारवाई केली जात नसल्याचे वास्तव आहे.

बॉक्स

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ५७२ सावकार

विभागात ९८८ परवानाधारक सावकार आहेत. त्यापैकी एकट्या अमरावती जिल्ह्यात ५७२ सावकार आहेत व त्यांच्याद्वारा एक लाख ८८४ शेतकऱ्यांना ९७.२७ कोटींचे कृषी कर्जवाटप करण्यात आल्याची सहकार विभागाची माहिती आहे. याशिवाय वाशिममध्ये २९ सावकारांद्वारा १२ शेतकऱ्यांना २,४५ लाख, बुलडाणा जिल्ह्यात ९१ सावकारांद्वारा चार शेतकऱ्यांना २.२७ लाख, यवतमाळमध्ये १०३ सावकारांद्वारा २६ शेतकऱ्यांना ९.९२ लाखांचे कृषी कर्जवाटप करण्यात आलेले आहे.

Web Title: One lakh farmers in Varada at the door of the lender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.