शेतकऱ्याची एक किलोमीटर रांग
By Admin | Updated: May 13, 2017 00:11 IST2017-05-13T00:11:26+5:302017-05-13T00:11:26+5:30
नाफेडतर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी सकाळी ७ वाजतापासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या वाहनांनी तूर विक्रीसाठी आणली.

शेतकऱ्याची एक किलोमीटर रांग
९२ क्विंटल तूर ‘जैसे थे’ : व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : नाफेडतर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेल्या तूर खरेदी केंद्रावर गुरुवारी सकाळी ७ वाजतापासूनच तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या वाहनांनी तूर विक्रीसाठी आणली. दिवसभरात जवळपास सहा हजार क्विंटलची आवक आली. बेवारस ९२ क्विंटलचा पंचनामा करून जैसे थे ठेवण्यात आली, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी हमीभाव मोडीत काढून कमी दराने खरेदीला सुरुवात केली आहे.
केंद्र शासनाने तूर खरेदीसाठी परवानगी दिल्यानंतर बुधवारपासून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी अमरावती महामार्गावर फिन्ले मिल स्टॉपपर्यंत शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, पिकअप व्हॅन आदी वाहनांची रांग लागली होती. जवळपास दीडशे वाहनांतून तूर विक्रीसाठी आणण्यात आली होती. त्यांचे बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सातबारा, आधारकार्ड व इतर कागदपत्रे तपासून नाफेड केंद्रावर जाण्यास मुभा देण्यात आली. गुरुवारी सहा हजार क्विंटल तुरीची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव मंगेश भेटाळू यांनी दिली. उपसभापती कुलदीप काळपांडे यांनी व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरात तूर खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचे सुचित केले.
९२ पोते ‘जैसे थे’
बुधवारी बेवारस आढळून आलेले ९२ तुरीचे पोते गुरुवारी जैसे थे पडून होते. पुढील कारवाई कुठलीच न झाल्याने चौकशीचा फार्स केला जात असल्याचा आरोप करीत गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.