कुटुंबातील एकाला हवी नोकरी अन् मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST2020-12-31T04:13:22+5:302020-12-31T04:13:22+5:30
प्रताप अडसड यांची शासनाकडे मागणी : नवनगर निर्मितीतील शेतकऱ्यांची घेतली भेट धामणगाव रेल्वे : कृषी समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येत ...

कुटुंबातील एकाला हवी नोकरी अन् मोबदला
प्रताप अडसड यांची शासनाकडे मागणी : नवनगर निर्मितीतील शेतकऱ्यांची घेतली भेट
धामणगाव रेल्वे : कृषी समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येत असलेल्या नवनगराची निर्मिती करताना चार गावांतील शेतकऱ्यांना जमिनीचे एकमुस्त रक्कम व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आ. प्रताप अडसड यांनी शासनाकडे केली आहे.
नागपूर-मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गालगत नवनगराची निर्मिती करण्यात येणार आहे. यात तालुक्यातील धामणगाव शहराजवळील दत्तापूर, आसेगाव, नारगावंडी, जळगाव आर्वी या गावांच्या परिसरातील तब्बल दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंचय पद्धतीने घेतली जाणार आहे. भूसंचय पद्धत म्हणजे शेतकऱ्यांना जिरायती जमिनीला प्रतिहेक्टर ७५ हजार रुपये प्रतिवर्ष व यात बागायती जमिनीला १ लाख १२ हजार ५०० रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर १.५० लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. हा मोबदला म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. कृषी समृद्धी प्रकल्पात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना एकमुस्त रक्कम देण्यात आली, त्याप्रमाणे नवनगरात जमीन जाणाऱ्या या शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी मोबदला म्हणून देण्यात यावी तसेच प्रकल्पग्रस्त होणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका मुलाला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रताप अडसड यांनी राज्य शासनाकडे केली. त्यांनी आसेगाव येथील शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. मी शेतकरीपुत्र असल्यामुळे सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे, असे आमदार प्रताप अडसड यांनी सांगितले. यावेळी आसेगावसह नवनगर निर्मितीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्या गावातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.