भूमका-पडियाल यांची एकदिवसीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 06:00 IST2019-09-12T06:00:00+5:302019-09-12T06:00:55+5:30

मेळघाटला लागलेला कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचा कलंक मिटविण्याकरिता आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभागाकडून कोट्यवधीचा निधी खर्च केला जात आहे. या समस्येच्या मुळाशी मेळघाटातील आदिवासी बांधवांची आरोग्य विभागापेक्षाही गावातील भूमका-पडियाल यांच्यावर असलेली आस्था आहे.

One-day workshop by Bhumka-Padiyal | भूमका-पडियाल यांची एकदिवसीय कार्यशाळा

भूमका-पडियाल यांची एकदिवसीय कार्यशाळा

ठळक मुद्देप्रकल्प अधिकाऱ्यांचा पुढाकार : आदिवासी रुग्णांना आरोग्यसेवेकडे वळविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : मेळघाटातील आदिवासी बांधवांचा गावातील भूमका-पडियाल यांच्याकडूनच कोणत्याही आजारावर उपचार करून घेण्याकडे कल असतो. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी बुधवारी भूमका-पडियाल यांची कार्यशाळा घेऊन आदिवासींना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आवाहन त्यांना केले.
मेळघाटला लागलेला कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचा कलंक मिटविण्याकरिता आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. आदिवासी विकास विभागाकडून कोट्यवधीचा निधी खर्च केला जात आहे. या समस्येच्या मुळाशी मेळघाटातील आदिवासी बांधवांची आरोग्य विभागापेक्षाही गावातील भूमका-पडियाल यांच्यावर असलेली आस्था आहे. मात्र, प्रत्येक आजाराला त्यांचे औषध लागेल असे नाही. गावातील कुपोषित बालक, गर्भवती मातासुद्धा जातात. त्यांना दवाखान्यात पाठविण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी सुशीलकुमार खिल्लारे यांनी मेळघाटातील भूमका-पडियाल यांना केले. आदिवासी रुग्ण आरोग्य केंद्रात पाठवा; त्याचे आपणास आरोग्य विभाग व आदिवासी विकास विभागाकडून मानधनसुद्धा मिळते. त्यामुळे त्यांनी आजारग्रस्तांना आरोग्य सेवेचा लाभ द्यावा किंवा परिसरातील वैद्यकीय अधिकारी व गावातील पोलीस पाटलांना माहिती द्यावी, असेही खिल्लारे म्हणाले.
कार्यशाळेला तालुका वैद्यकीय अधिकारी शशिकांत पवार, प्रसूतितज्ज्ञ प्रीती शेंद्रे, सहायक प्रकल्प अधिकारी किशोर पटेल, अब्दुल कलाम योजनेचे सदस्य रमेश तोटे, राहुल तिवारी यांच्यासह भूमका-पडियाल यांची उपस्थिती होती.

Web Title: One-day workshop by Bhumka-Padiyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.