पडझड झालेल्या घरांचे एक कोटीचे अनुदान रखडले
By Admin | Updated: December 22, 2015 00:15 IST2015-12-22T00:15:19+5:302015-12-22T00:15:19+5:30
यंदाच्या पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ३ हजार ६०५ घरांची पडझड झाली.

पडझड झालेल्या घरांचे एक कोटीचे अनुदान रखडले
दिरंगाई : विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ३ हजार ६०५ घरांची पडझड झाली. यासाठी जिल्हा प्रशासनाने ११ सप्टेंबर रोजी १ कोटी ४० लाख ६० हजारांचा निधी तालुक्यांना वितरित केला. परंतु तालुकास्तरावर गांभीर्याने न घेतल्याने अद्याप १ कोटी २ लाख ६६ हजार ५३१ रुपयांच्या निधीचे वाटप रखडले आहेत.
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात व प्रामुख्याने ४ व ५ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या दोन दिवसांत साधारणपणे ३५० मि.मी. पाऊस पडला. यामध्ये जिल्ह्यातील ३ हजार ६०५ घरांची पडझड झाली. यासाठी जिल्हा प्रशासनाला १ कोटी ४० लाख ६० हजारांचा निधी प्राप्त झाला. पडझड झालेल्या घरांची तलाठी, ग्रामसेवक व पंचायत समिती तसेच बांधकाम विभागाच्या अभियंत्याद्वारा सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने हा निधी ११ सप्टेंबर २०१५ रोजी सर्व तालुक्यांना वितरित केला. साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटला असताना अद्याप २ हजार ८३१ घरांच्या पडझडीसाठी तालुका प्रशासनाने निधी वितरित केलेला नाही.
सद्यस्थितीत केवळ ३७ लाख ९३ हजार ४३९ हजार रुपयांचे वितरण तालुकास्तरावर झालेले आहे. अनुदान वाटपाची ही केवळ २४ टक्केवारी आहे. अद्याप ७६ टक्के अनुदानाचे वाटप बाकी आहे. यासाठी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना पत्र दिले आहे. या निधीचे वाटप न झाल्यास ३१ मार्च रोजी हा निधी शासनाला समर्पित करावा लागेल. यासंदर्भात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.