वृध्दाला मिळाले रोखलेले अनुदान
By Admin | Updated: July 8, 2015 00:31 IST2015-07-08T00:31:21+5:302015-07-08T00:31:21+5:30
येथील बाबाराव लक्ष्मण इंगळे (६८) या वृध्द शेतकऱ्याचे पीक कर्जाच्या सबबीखाली श्रावणबाळ वृध्द निराधार ...

वृध्दाला मिळाले रोखलेले अनुदान
शिवणी रसुलापूर : येथील बाबाराव लक्ष्मण इंगळे (६८) या वृध्द शेतकऱ्याचे पीक कर्जाच्या सबबीखाली श्रावणबाळ वृध्द निराधार योजनेंतर्गत दरमहा मिळणारे अनुदान बँंकेने रोखल्यामुळे त्यांनी सेंट्रल बँकेच्या नांदगाव खंडेश्वर शाखेसमोर उपोषण सुरु केले होते.
बाबाराव इंगळे यांना यापूर्वी नियमित मिळणारे निराधार पेंशन गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. याबाबत त्यांनी बँक व्यवस्थापकाची भेट घेतली. तेव्हा त्यांनी ते अनुदान त्यांच्या २००६-२००७ मधील पीक कर्जात जमा करण्यात येत असल्याची तोंडी माहिती दिली. याबाबत त्यांनी तहसीलदारांची लेखी तक्रारीसह भेट घेतली. त्यावर पेंशनची रक्कम रोखता येत नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले. बाबाराव इंगळे यांनी अनेकदा तहसील कार्यालयात पायपीट करुनही लाभ मिळाला नसल्याने त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली होती. शासनामार्फत गोरगरिब नागरिकांच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जात असताना योजनेची अंमलपबजावणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे लाभार्थ्याला लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
गेल्या सहा महिन्यांत वारंवार चकरा मारुनही न्याय मिळत नसल्याने त्यांनी ६ जुलैपासून सेंट्रल बँक शाखा, नांदगाव समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. अखेर बँक प्रशासनाने नमते घेऊन त्यांना श्रावणबाळ निराधार योजनेअंतर्गत चार महिन्यांचे अनुदान दिले. नंतर त्यांच्या उपोषणाची सांगता तहसीलदारांच्या हस्ते निंबू पाणी पाजून करण्यात आली. (वार्ताहर)