जुन्या पेन्शन योजनेबाबत तडजोड नाही
By Admin | Updated: March 19, 2016 00:15 IST2016-03-19T00:15:23+5:302016-03-19T00:15:23+5:30
जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत शिक्षक महासंघ ...

जुन्या पेन्शन योजनेबाबत तडजोड नाही
शेखर भोयर : मुंबईत निघाला महामोर्चा
अमरावती : जुनी पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद असून जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत शिक्षक महासंघ सदैव कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी केले.
मुंबई येथे जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या महामोर्चाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत आ. सतीश चव्हाण, आ. पिचड, आ. सुधीर तांबे, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह राज्यातील हजारो शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाची अंशदायी निवृत्ती योजना फसवी असून सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने लढा उभारला आहे. या लढ्याला अधिक आक्रमक करण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात आला.
कर्मचारी हिताच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या शासनाविरोधात हा महामोर्चा म्हणजे निद्रिस्त शासनाला जागे करण्याचे साधन आहे. या मागणीला जोवर यश मिळणार नाही, तोवर शिक्षक महासंघ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लढत राहील, असे आश्वास यावेळी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांनी दिले. (प्रतिनिधी)