धामणगावात तेल, खनिजाचा शोध; ओएनजीसीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 20:32 IST2019-01-17T20:32:10+5:302019-01-17T20:32:41+5:30
कच्च्या तेलाची वाढती मागणी पुरी करण्यासाठी केंद्र शासनाने देशांतर्गत काही भागात भूगर्भामधील खनिजांचा शोध घेणे सुरू केले असून, त्यामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्याचा समावेश आहे.

धामणगावात तेल, खनिजाचा शोध; ओएनजीसीचा पुढाकार
मोहन राऊत/
अमरावती : कच्च्या तेलाची वाढती मागणी पुरी करण्यासाठी केंद्र शासनाने देशांतर्गत काही भागात भूगर्भामधील खनिजांचा शोध घेणे सुरू केले असून, त्यामध्ये धामणगाव रेल्वे तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यातील आठ गावांचे सर्वेक्षण सॅटेलाइटद्वारे केल्यानंतर प्राथमिक स्वरूपात बोअरद्वारे खोदकामास सुरुवात झाली आहे.
देशाला पुरविल्या जाणाऱ्या खनिज तेलात ६९ टक्के आणि नैसर्गिक वायूत ६२ टक्के वाटा आॅइल अँड नॅशनल गॅस कॉपोरेशनचा आहे. ओएनजीसी ही संस्था खनिज तेलाचा शोध घेत असते. अमरावती जिल्ह्यातील काही भागात ही शोधमोहीम मागील महिन्यांपासून सुरुवात करण्यात आली. हैदराबाद येथील अल्फा जिओ (इंडिया) बंजारा या कंपनीशी ओएनजीसीने करारनामा केल्यानंतर जिल्ह्यातील विविध विभागांकडून परवानगी घेऊन शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे.
दोनशे फूट बोअर
धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी, काशीखेड, विरुळ रोंघे, वडगाव राजदी, रामगाव, दिपोरी, वाढोणा, तिवरा या भागात अल्फा जिओच्या माध्यमातून दोनशे फूट बोअर खोलीकरण करण्यात येत आहे. येथे तेल व नैसर्गिक वायू मिळते का, याची चाचपणी करण्यात येत आहे. या ठिकाणी खोदकामात मिळालेले नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत.
शेतकरी संभ्रमावस्थेत
महसूल विभाग व शेतकºयांना अंधारात ठेवून थेट शेतातच बोअर मारण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यामुळे आपल्या शेतात नेमके काय सुरू आहे, याविषयी शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. महसूल विभागाने यासंदर्भात माहिती देणे गरजेचे असल्याचे मत काही शेतकºयांनी व्यक्त केले.
खनिज तेलाच्या शोधासाठी वनविभागाने अल्फा जिओ कंपनीला परवानगी दिली आहे. वनविभागाच्या कक्षेत असलेल्या जागेवर बोअर करण्याची संमती दिली आहे.
- आशिष कोकाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूर रेल्वे