अचलपूर नगरपालिकेतील ऑनलाईन सभेला ऑफलाईन गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:13 AM2021-05-19T04:13:40+5:302021-05-19T04:13:40+5:30

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा १७ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन होते. तसे ...

Offline crowd at an online meeting in Achalpur Municipality | अचलपूर नगरपालिकेतील ऑनलाईन सभेला ऑफलाईन गर्दी

अचलपूर नगरपालिकेतील ऑनलाईन सभेला ऑफलाईन गर्दी

Next

परतवाडा : अचलपूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा १७ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन होते. तसे निर्देश पत्राद्वारे नगराध्यक्ष सुनीता फिसके यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. असे असतानाही या ऑनलाईन सभेला ऑफलाईन गर्दी बघायला मिळाली. यात काही सभागृहाबाहेर खिडकीच्या काचांमधून आत डोकावताना, तर काही चक्क सभागृहात येऊन गर्दी करीत होते.

सभा ही ऑनलाईन असली तरी सभागृहातील ओट्यावर प्रशासकीय यंत्रणेतील सदस्यांचीही बऱ्यापैकी उपस्थिती होती. ही ऑफलाईन गर्दी कोविड १९ च्या अनुषंगाने लक्षवेधक ठरली. वेगवेगळ्या चर्चांना जन्म देणारी ठरली. कोविड-१९ विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्व विहित बैठका, सभा या नियमितपणे केवळ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्याचे निर्देश नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी जुलै २०२० मध्येच निर्गमित केले. याचा संदर्भ देत नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष ऑनलाइन सभेकडे वेधले होते.

१७ मे रोजीच्या ऑनलाईन सभेत अडचण येऊ नये म्हणून १३ मे रोजी ऑनलाईन सभेचे प्रात्यक्षिक घेण्यास नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना सुचवले होते. असे असतानाही झालेली ही ऑफलाईन गर्दी कोरोनाला आमंत्रण देणारी ठरू शकते. कोरोनाच्या नावावर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारणाऱ्यांनी ही ऑफ लाईन गर्दी स्विकारावी, यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्वसाधारण सभेत एकूण २२ विषय घेतले गेले. यातील आठ विषय नामंजूर केले गेले, तर १४ विषय मंजूर केले गेले. यात कोविड-१९ च्या अनुषंगाने अचलपूर परतवाडा शहरातील सर्व स्मशानभूमीमध्ये विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामास जिल्हा नियोजन समितीकडे आर्थिक व प्रशासकीय मंजुरीकरिता प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा पार पडली.

सभेत काही नगरसेवकांनी सभागृहात प्रत्यक्ष हजेरी लावून काही विषयांवर ऑफलाइन चर्चा घडवून आणली. विषय संबंधित असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन प्रशासनासोबत चर्चा करावी लागल्याचे त्या नगरसेवकांनी स्पष्ट केले.

Web Title: Offline crowd at an online meeting in Achalpur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.