अमरावती : मंत्री अथवा पालकमंत्र्यांचे दौरे असल्यास अधिकारी राजशिष्टाचारच्या (प्रोटोकॉल) नावे दोन ते तीन तास कार्यालयीन वेळ वाया घालवतात. मात्र, यापुढे मी दौऱ्यावर कुठेही असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉलच्या नावाने वेळ वाया घालवू नये, त्याऐवजी कार्यालयात बसून सामान्य नागरिक, शेतकऱ्यांची प्रशासकीय कामे मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे यंत्रणांना दिल्यात.
ना. बावनकुळे हे अमरावतीत दौऱ्यावर आले असता, ते माध्यमांशी बोलत होते. यापुढे माझ्या कोणत्याही दौऱ्यात 'प्रोटोकॉल' मध्ये येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी येऊ नये. मंत्र्यांचे दौरे लागले की, अधिकारी दोन ते तीन तास 'प्रोटोकॉल'च्या नावाने कार्यालयीन वेळ वाया घालवतात. त्यामुळे माझ्या दौऱ्यात येण्याऐवजी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयातच बसून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजुरांची महत्त्वाचे काम मार्गी लावावे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यासह विदर्भाचा विकासाला वेग येईल, असे ते म्हणाले.