'वरली-मटका किंग'ना 'बाजीराव'चा प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 00:17 IST2016-10-15T00:17:01+5:302016-10-15T00:17:01+5:30
जुगार अड्ड्यावरील पालकमंत्र्यांचा छाप्याचा हादरा पोलीस आयुक्तालयाला बसला.

'वरली-मटका किंग'ना 'बाजीराव'चा प्रसाद
धाबे दणाणले : १७ सट्टा व्यावसायिकांची सीपींसमोर पेशी
अमरावती : जुगार अड्ड्यावरील पालकमंत्र्यांचा छाप्याचा हादरा पोलीस आयुक्तालयाला बसला. पीआयसह पाच पोलिसांचे निलंबन झाल्याने पोलीस वर्तळात खळबळ उडाली आहे. दोन दिवसात तब्बल १७ 'वरली-मटका किंग' ची पेशी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर करण्यात आली. त्यांना पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे कायमस्वरुपी बंद ठेवण्यासाठी तंबी देऊन बाजीराव पट्ट्याचा प्रसाद दिल्याचे आरोपींच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होते.
दसऱ्याच्या दिवशीच सिंघम पालकमंत्र्यांनी धाड टाकून जुगाऱ्यांना पकडून दिले. ही कारवाई पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेला चव्हाट्यावर आणणारीच ठरली. शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील या प्रकाराची दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सर्व ठाणेदारांची बैठक बोलावून अवैध व्यवसाय कायमचे बंद झालेच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्यातच शहरातील वरली किंगची पेशी करण्याचे निर्देश ठाणेदाराला दिले. त्यानुसार गुरुवारी शहरातील १३ व शुक्रवारी सात वरली किंगची पोलीस आयुक्तांसमोर पेशी करण्यात आली होती. एक-एक वरली किंगची पेशी होत होती. हे वरली किंग आयुक्तांच्या दालना गेल्यानंतर आतून बाजीराव पट्ट्याच्या आवाजासोबत वरली किंगंचा आरडाओरड ऐकू येत होती. वरली किंग सीपींच्या दालनाबाहेर निघाल्यानंतर त्यांना बाजीरावचा प्रसाद मिळाल्याचा अंदाज येत होता. त्यांच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तो अंदाज येत होताच. सीपीच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले असून पोलीस वर्तळातही प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्तांकडून रवी गुप्ताची कानउघाडणी
बच्छराज प्लॉट येथील जुगारावर पालकमंत्र्यांनी धाड टाकल्यानंतर मुख्य आरोपी रवी गुप्ता पसार झाला. त्याने न्यायालयातून जामीन मिळविला असून त्याची पेशीसुद्धा सीपींसमोर करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांनी आरोपी रवि गुप्ताचीही चांगलीच कानउघाडणी करून अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद करण्यासाठी तंबी दिली.
शहरात अवैध व्यवसाय खपवून घेणार नाही. ते कायमस्वरुपी बंद व्हावेत, अशी तंबी वरली किंगला दिली. याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी कळवावे, कारवाई करू. आवश्यक वाटल्यास मी रस्त्यावर उतरेन.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त, अमरावती