दहा ग्रामपंचायतींना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:16 IST2021-08-19T04:16:55+5:302021-08-19T04:16:55+5:30

अमरावती : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हगणदरीमुक्त गावांमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य जिल्ह्यात गती घेत असून, आता जिल्ह्यातील ...

ODF Plus status for ten Gram Panchayats | दहा ग्रामपंचायतींना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा

दहा ग्रामपंचायतींना ‘ओडीएफ प्लस’चा दर्जा

अमरावती : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत हगणदरीमुक्त गावांमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य जिल्ह्यात गती घेत असून, आता जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) - २ ची अंमलबजावणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये शाश्वत स्वच्छतेच्या अनुषंगाने कामे सुरू आहेत. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासोबतच शाळा, अंगणवाडी व गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देणे, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा वापर व त्यासंबंधीची जाणीवजागृती, सार्वजनिक तसेच वैयक्तिक शोषखड्डे, स्थिरीकरण तळे, प्लास्टिक कचरा वर्गीकरण संकलन आणि साठवण सुविधा आदी निकषांची पूर्तता करणारी गावे हगणदरीमुक्त अधिक घोषित करण्यात येणार आहेत.

बॉक्स

या आहेत ओडीएफ ग्रामपंचायतीची

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती हगणदरीमुक्त अधिक घोषित करण्यात आल्या. त्यामधे धनोडी, सावंगा (ता. वरूड), गोविंदपूर (ता. चांदूर बाजार), बोरगाव निस्ताने (ता. धामणगाव रेल्वे), सावळी दतुरा (ता. अचलपूर), पार्डी (ता. अमरावती), लेहगाव, सावरखेड (ता. मोर्शी), मोखड (ता. नांदगाव खंडेश्वर), खिरगव्हाण (ता. अंजनगाव) यांचा समावेश आहे

बॉक्स

ओडीएफ प्लस म्हणजे काय?

हगणदरीमुक्त अधिक म्हणजेच ओडीएफ प्लस. हगणदरीमुक्त झालेल्या गावांमधे शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासोबतच सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयाचा नियमित वापर, शाळा अंगणवाडी तसेच गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या सोयी सुविधा आणी गावाची दृश्यमान स्वच्छता कायम राखणे होय.

कोट

शाश्वत स्वच्छतेच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींनी कार्याची दिशा ठरवत आपले गाव ओडीएफ प्लस होण्यासाठी पुढाकार घ्यावा. शौचालयांचा नियमित वापर, सांडपाणी-घनकचरा व्यवस्थापन, शाळा अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व इतर आनुषंगिक बाबींची पूर्तता करीत गाव हगणदरीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: ODF Plus status for ten Gram Panchayats