जोशी मार्केट मार्गावरील फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा
By Admin | Updated: June 18, 2016 00:06 IST2016-06-18T00:06:16+5:302016-06-18T00:06:16+5:30
येथील जोशी मार्केट मार्गावर अनेक व्यावसायिकांना अनधिकृतपणे आपली किरकोळ दुकाने थाटली आहे.

जोशी मार्केट मार्गावरील फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा
पोलीस, मनपाचे दुर्लक्ष : आयुक्तांनी घ्यावी दखल
संदीप मानकर अमरावती
येथील जोशी मार्केट मार्गावर अनेक व्यावसायिकांना अनधिकृतपणे आपली किरकोळ दुकाने थाटली आहे. रस्त्यांपर्यंत अनेक हातगाडीधारक कपडे विक्रेते राजोरोसपणे व्यवसाय करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या बाबीकडे महानगरपालिकेचे आयुक्त हेमंत पवार यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
अनेक वर्षांपासून हे व्यवसायिक महानगरपालिकेच्या रस्त्यांवर अवैधरीत्या व्यवसाय करतात. अत्यंत वर्दळीचे असलेले हे ठिकाण या व्यावसायिकांनी व्यापल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. हजारो वाहने येथून रोज ये-जा करीतात. पण अनेक कपड्यांच्या व इतर साहित्यांच्या व्यावसायिकांनी या ठिकाणी आपली दुकाने राजरोसपणे थाटली आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या व्यावसायिकांना महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलनविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचे अभय का, अशी चर्चा होत आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक पोलिसांनी करावी करवाई
या ठिकाणी भररस्त्यांवर हातगाडीवाले कपड्यांची विक्री करतात. यामुळे हे कपडे पाहण्यासाठी बरेच वेळा नागरिकांची गर्दी होते. यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागते. या हातगाडी चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न अंबानगरीतील जागरूक नागरिक विचारत आहेत.