ट्युबोप्लॅस्टिनंतर बारा महिलांना अपत्यप्राप्ती
By Admin | Updated: July 20, 2016 23:59 IST2016-07-20T23:59:17+5:302016-07-20T23:59:17+5:30
गर्भाशयालगत असलेल्या नलिकेवर ट्युबोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करुन १२ महिलांनी वर्षभरात गोंडस बाळाना जन्म दिला आहे.

ट्युबोप्लॅस्टिनंतर बारा महिलांना अपत्यप्राप्ती
रुग्णांना दिलासा : सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांची यशस्वी कामगीरी
संदीप मानकर अमरावती
गर्भाशयालगत असलेल्या नलिकेवर ट्युबोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करुन १२ महिलांनी वर्षभरात गोंडस बाळाना जन्म दिला आहे. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉक्टरांनी ही यशस्वी कामगिरी बजावली आहे.
स्त्रियांना अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय तसेच त्यालगत असलेल्या नलीका सुस्थितीत असणे गरजेचे असते. या नलिकेमध्ये काही दोष असल्यास महिलांना गर्भधारणा होत नाही. अशावेळी डॉक्टर टयुबोप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला महिलांना देतात. या शत्रक्रियेनंतर महिलांना गर्भधारणा होऊ शकते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वर्षभरात १२ महिलांमध्ये हा दोष आढळून आला होता. त्यानुसार डॉक्टरांनी या महिलांची तपासणी केली व त्यांना टयुबोप्लॅस्टी शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली. त्यानंतर पाचही जिल्हयातून दाखल झालेल्या बारा महिलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलांपैकी दोन महिलांचे कुटूंब नियोजनातून नसबंदीची शस्त्रक्रिया झाली होती. या दोन्ही महिलांना प्रत्येकी दोन-दोन मुले होती. परंतु काही वर्षापूर्वी ती मुले दगावली. त्यामुळे त्या महिलांना पुन्हा अपत्य हवे होते. या महिलाना सुध्दा शस्त्रक्रियानंतर अपत्य प्राप्ती झाली आहे.
सुपर स्पेशालिटीचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ट्यूबोप्लॅस्टी शस्त्रक्रिया तज्ज्ञ भरत शहा यांनी या महिलांवर नलिकेवर ट्युबो प्लॅस्टी ही शस्त्रक्रिया करुन त्या नलिका सुस्थितीत करण्यात आल्यात. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने त्या महिलांची गर्भधारणेची अडचण दूर करण्यात आली. त्यामुळे शस्त्रक्रियानंतर महिलांचा अपत्यप्राप्तीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी गोंडस बाळांना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात आली असून यामुळे या सर्व मातांना मुले जन्माला घालता आले.
नसबंदीनंतरही दोन महिलांना मुले
दोन महिलांनी कुटूंब नियोजनासाठी नसबंदीची शस्त्रक्रिया केली होती. मात्र, दोन्ही महिलांचे मुले काही कारणास्तव दगावले. त्यामुळे त्यांच्या घरात वंशाचा दिवा नव्हता. आता आपल्याला मुलेही होणार नाही. या चिंतेने त्या महिला अस्वस्थ होत्या. मात्र, त्यांना ट्युबो प्लॅस्टी या शस्त्रक्रियेची माहिती सुपर स्पेशालिटीतील तज्ज्ञ डॉक्टरानी दिली. त्या दोन्ही महिलांनी ट्युबो प्लॅस्टीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना अपत्य प्राप्ती झाली. त्यामुळे आपल्याला पुन्हा गोंडस बाळ झाल्याचा आनंद त्यांचा गगणात मावेनासा होता.
ट्युबोप्लॅस्टी शस्त्रक्रिया ही नि:शुल्क करण्यात येते. या शस्त्रक्रियेमुळे त्या १२ महिलांचा अपत्य प्राप्तीचा मार्ग मोकळा झाला होता. त्या सर्व महिलांना गोंडस बाळांना जन्म दिला असून त्या सुखरुप आहेत. ही सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांची यशस्वी कामगिरी आहे.
- श्यामसुंदर निकम, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल