पोषण आहारातील ज्वारी, नाचणीचे पदार्थ कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:44+5:30
शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता विद्यार्थिसंख्या मंजूर केली जाते. जिल्ह्यात शेकडो शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.

पोषण आहारातील ज्वारी, नाचणीचे पदार्थ कागदावरच!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाने चार महिन्यांपूर्वी शालेय पोषण आहारात बदल करून ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ देण्याची योजना आणली होती. या योजनेची अंमलबजावणी गेल्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून केली जाणार होती. परंतु योग्य नियोजनाअभावी योजना राबविण्यासाठी २५ टक्के तांदळाची कपात करून बाजरी, ज्वारी आणि नाचणीची मागणीच नसल्याने ही योजना कागदावरच राहिली आहे.
शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीकरिता विद्यार्थिसंख्या मंजूर केली जाते. जिल्ह्यात शेकडो शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या आहारात विविधता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या पदार्थांचा समावेश करण्याचा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार पोषण आहारासाठी तांदळाच्या मागणीत २५ टक्क्यांची कपात करून त्याऐवजी ज्वारी, नाचणी, बाजरी या धान्यांचा वापर करून विविध पदार्थ पाककृती निश्चित करण्याच्या सूचनाही जिल्हास्तरावर देण्यात आल्या होत्या. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आक्टोबर २०१९ ते मार्च २०२० या वर्षाकरिता ज्वारी, नाचणी व बाजरीची मागणी विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. चार महिन्यानंतरही याच्या अंमलबजावणीसाठी धान्याची मागणी नोंदविण्यात आली नाही.
शालेय पोषण आहारातील बदलानुसार ज्वारी, बाजरी आणि नाचणीची मागणी करण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्याच वेळी या संदर्भात स्वतंत्र निर्णय होणार, असे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप अशा कोणत्या सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे हे आहार वितरित होत नसून पूर्वीच्या पुरवठ्यातून शालेय पोषण आहार दिला जात आहे.
- नितीन उंडे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक