प्रत्येक तालुक्यात आता रोपवाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:11 IST2021-06-02T04:11:04+5:302021-06-02T04:11:04+5:30
अमरावती : भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात ...

प्रत्येक तालुक्यात आता रोपवाटिका
अमरावती : भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषिविकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना राबविण्यात येत आहे. शेतकरी बांधवांना रोपवाटिकेसाठी फ्लॅट टाईप शेडनेट, प्लास्टिक टनेल निर्मितीसह इतर साधनसामग्री अनुदान तत्वावर दिली जाते. यानुसार प्रत्येक तालुक्यात रोपवाटिका तसेच लक्ष्यांक पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मुख्य पिकांबरोबरच भाजीपाला उत्पादन व इतर पूरक उद्योगांनाही चालना देण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेत शेतकऱ्यांना भाजीपाला रोपवाटिका निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी १५ व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन अशा एकूण १८ रोपवाटिकांचे उद्दिष्ट आहे. तथापि, काही तालुक्यांचा लक्ष्यांक पूर्ण झालेला नाही. त्यामुळे याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शेतकरी बांधवांना योजनेची माहिती देऊन अर्ज करण्यास प्रोत्साहन द्यावे. मुख्य पिकांबरोबरच भाजीपाला उत्पादनामुळे उत्पन्नवाढीस मदत होणार आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बॉक्स
योजनेची जिल्हास्थिती
अमरावती, मोर्शी, अचलपूर या तालुक्यांना सर्वसाधारण व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे रोपवाटिकेचे वितरण करण्यात आले. भातकुली, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, वरूड, चांदूर बाजार या तालुक्यांतून अर्ज निरंक आहेत. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गाचे लक्ष्यांक शिल्लक आहे. अमरावती, अचलपूर, मोर्शी या तालुक्यांत अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रत्येकी एक याप्रमाणे लक्ष्यांक शिल्लक आहे.
बॉक्स
योजनेत सहभागीचा प्राधान्यक्रम
योजनेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. रोपवाटिका उभारणीसाठी त्या ठिकाणी पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. योजनेत महिला कृषी पदवीधरांना प्रथम, महिला गट किंवा महिला शेतकरी यांना द्वितीय, तर भाजीपाला उत्पादक, अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतकरी गट यांना तृतीय क्रमांकावर प्राधान्य राहील.
बॉक्स
योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष
योजनेअंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारायची आहे. या घटकासाठी यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खासगी रोपवाटिकाधारक, शासनाच्या लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिका तसेच राष्ट्रीय कृषिविकास योजना, एमआयडीएच, पोकरा किंवा इतर योजनांतून संरक्षित शेती घटकांचा लाभ घेतलेले लाभार्थी यांना लाभ मिळणार नाही.