नर्सरी, केजीच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष अधांतरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST2021-05-30T04:11:33+5:302021-05-30T04:11:33+5:30
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यंदादेखील शाळा बंद ...

नर्सरी, केजीच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष अधांतरी
अमरावती : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे यंदादेखील शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे नर्सरी, केजीच्या हजारो मुलांचे वर्ष घरातच घालवावे लागणार आहे.
कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद होत्या. घराबाहेरही पडता येत नसल्याने मुलांमध्ये चिडचिड वाढली असून, काही मुलांना टीव्ही, मोबाईल पाहण्याची सवय लागली आहे. वर्षभरापासून पालक मुलांना सांभाळून हैरान झाले आहेत. यादरम्यान दिवाळीपर्यंत मोठ्या मुलांच्या शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. परंतु, पूर्वप्राथमिक शाळांचे यंदादेखील कठीण आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. वर्षभरापासून सतत घरी राहून मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अशावेळी पालकांनी मुलांसोबत पूर्ण वेळ घालवून त्यांच्यासोबत विविध प्रकारचे घरगुती खेळ, चित्रकला, क्राफ्ट, व्यायाम यामध्ये मुलांचे मन गुंतवून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज आहे. घरी आहेत म्हणून केवळ अभ्यासाचा आग्रह न धरता मनमोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी पालकांनी दिली पाहिजे. कोरोनाबाबत पुढे काय परिस्थिती येणार, हे सांगणे कठीण आहे. परंतु, पुढचे दोन महिने तरी पूर्वप्राथमिक वर्ग सुरू होणार नाहीत. परिस्थिती सुधारली, तर दिवाळीनंतर वर्ग सुरू होतील. त्याआधी मोठ्या मुलांचे वर्ग सुरू होतील. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया चालेल, अशी प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त केले आहे.
कोट
कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे मुलांच्या शाळा बंद आहेत. टीव्ही आणि मोबाईलचा नाद, चिडचिड होत आहे. त्यांना आम्हीदेखील कंटाळलो आहोत. कधी शाळा सुरू होईल, याची आम्ही वाट पाहत आहोत.
- रोशनी कावरे, पालक
कोट
कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता, पूर्व प्राथमिक वर्ग आणखी वर्षभर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुलांच्या अभ्यासाचे नियोजन पालकांनी करून दिले आहे. त्यासोबतच खेळ आणि कलागुणांना वाव देण्याचा आग्रह आम्ही पालकांकडे धरत आहोत. लहान मुले घरी चांगला अभ्यास करतात.
- महेश खारोडे, शाळा संस्थाचालक