लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नववी ते बारावीो वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. मात्र, कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे बहुतांश पालकांची मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळे शाळा ओस पडल्याचे चित्र होते. गत आठवड्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. चार हजार विद्यार्थ्यांची यात भर पडली आहे. ही बाब शिक्षणक्षेत्रासाठी खूशखबर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने ‘लस नाही तर शाळा नाही’ ही भूमिका पालकांनी घेतली. त्यामुळे शाळा सुरू होऊनही संमतिपत्र देण्यास टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही आश्रमशाळा, वसतिगृहांशी संलग्न शाळांमध्ये प्रकर्षाने जाणवली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहा हजारांच्या आत असलेली संख्या आता १३३११ एवढी नोंदविली गेली आहे. शिक्षकांमध्येही कोरोनाची भीती हळूहळू कमी होत आहे.
कोरोना संसर्ग ओसरत चालल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती कमी होत आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून नववी ते बारावीपर्यंत चार हजार विद्यार्थिसंख्या वाढली आहे. २३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान एकही विद्यार्थी संक्रमित आढळून आला नाही.- वामन बोलके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)