एचआयव्ही रुग्णांची संख्या घटली

By Admin | Updated: May 28, 2016 00:07 IST2016-05-28T00:07:11+5:302016-05-28T00:07:11+5:30

जिल्ह्यात एचआयव्ही, एड्स या आजारासंबंधी सेवा-सुविधा व जनजागृतीला व्यापक स्वरूप दिले गेले आहे.

The number of HIV patients decreased | एचआयव्ही रुग्णांची संख्या घटली

एचआयव्ही रुग्णांची संख्या घटली

सीएस राऊत यांचा दावा : एकात्मिक समुपदेशन केंद्रामुळे फायदा
अमरावती : जिल्ह्यात एचआयव्ही, एड्स या आजारासंबंधी सेवा-सुविधा व जनजागृतीला व्यापक स्वरूप दिले गेले आहे. शिवाय जिल्ह्यातील ११८ एकात्मिक समुपदेशन केंद्रांमुळे एचआयव्ही संक्रमित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अजय साखरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, शहरी आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक महल्ले, एआरटी केंद्राचे नोडल अधिकारी, जिल्हा स्त्री रूग्णालय, जिल्हा उद्योग केंद्र्र, जिल्हा महिला व बालविकास, एनएचएमचे कार्यक्रम व्यवस्थापक, लक्षगट प्रकल्प, लिंक वर्कर कार्यक्रम, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक, राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी व अंजली देशमुख, रोशनी टिकले, पी.टी. खडसे आदी उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले, एचआयव्ही-एड्स आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात एकूण ११८ समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. यामध्ये १६ शासकीय, ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रात, ३६ खासगी रुग्णालयात, ८ शहरी आरोग्य केंद्रात, १ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व १ संदर्भ सेवा रुग्णालयातील समुपदेशन केंद्राद्वारे एड्स रुग्णांना समुपदेशन करण्यात येते. परिणामी वर्षभरात एचआयव्ही संक्रमित ५२ रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील सर्व रुग्णालयात एक लाख तीन हजार सामान्य व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सन २०१४-१५ या वर्षात ४४२ एचआयव्ही संक्रमित रुग्ण आढळून आले, तर सन २०१५-१६ या वर्षात ३९० एचआयव्ही संक्रमित रुग्ण आढळून आलेत. या वर्षात ५६ हजार गर्भवती तपासणीचे उद्दिष्ट असताना ५७ हजार गर्भवतींची तपासणी केली असता १६ गर्भवती एचआयव्ही संक्रमित आढळल्यात. त्यात १५ गर्भवतींना औषधोपचार करून एचआयव्हीमुक्त करण्यात आले.
नवीन तंत्रज्ञानामुळे तर सर्व एचआयव्ही संक्रमित बालके एचआयव्ही निगेटिव्ह निघतात. तसेच जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांत एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी भरपूर औषधींचा साठा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक रुग्णावर ४ ते १८ हजार रूपयांपर्यंत खर्च करण्यात येतो. एचआयव्ही संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होण्यामागे स्वयंसेवी संस्थांचे मोठे योगदान आहे. शासन व एनजीओंच्यावतीने नि:शुल्क प्रचार मोहीम आखली जाते. विद्यापीठाचेही मोठे योगदान आहे. राष्ट्रीय छात्रसेना मोठे काम करते. (प्रतिनिधी)

Web Title: The number of HIV patients decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.