गृहराज्यमंत्र्यांसाठी एनआरएचएम वेठीस
By Admin | Updated: May 28, 2016 00:01 IST2016-05-28T00:01:55+5:302016-05-28T00:01:55+5:30
आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेंंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या ....

गृहराज्यमंत्र्यांसाठी एनआरएचएम वेठीस
पदवीधर नोंदणी : युवक काँग्रेसकडून प्रकार उघड
अमरावती : आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेंंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयातून मतदार नोंदणी सुरू असल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील हे पदवीधर मतदारसंघासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.
युवक काँग्रेसचे भय्या पवार, राहुल येवले, आदित्य पेलागडे, सागर देशमुख, गुड्डू धर्माळे व अन्य पदाधिकारी कामानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारातील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयात २७ मे रोजी दुपारी गेले. तेथे त्यांना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकांच्या टेबलवर पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणी अर्जांचे वाटप केले जात असल्याचा प्रकार आढळून आला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची यादीदेखील मतदार नोंदणीसाठी याठिकाणी आढळली. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करतात.
मतदार नोंदणीचा भंडाफोड
अमरावती : त्यामुळे युवक काँग्रेसने यावर आक्षेप घेत उपस्थित कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. मात्र, संबंधितांनी याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. ही सर्व प्रक्रिया शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग करीत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या माध्यमातून केली जात असल्याचा आरोप युवक काँग्रेचे राष्ट्रीय सरचिटणीस भय्या पवार यांनी केला आहे. हा खळबळजनक प्रकार उघडकीस येताच याची माहिती युकाँच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून दिली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या कार्यालयातून पदविधर मतदार नोंदणीचे जवळपास दीड हजार अर्ज दिसून आलेत. यासंदर्भात गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.