सेवा समाप्तीच्या आदेशाविरोधात एनआरएचएम कर्मचारी एकवटलेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:13 IST2021-05-07T04:13:34+5:302021-05-07T04:13:34+5:30
जिल्हाकचेरीवर धडक; जिल्हा सनियंत्रण अधिकाऱ्यावरील कारवाई रद्दची मागणी अमरावती : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी ...

सेवा समाप्तीच्या आदेशाविरोधात एनआरएचएम कर्मचारी एकवटलेत
जिल्हाकचेरीवर धडक; जिल्हा सनियंत्रण अधिकाऱ्यावरील कारवाई रद्दची मागणी
अमरावती : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी यांच्या सेवा समाप्तीचे कुठलीही पूर्वसूचना न देता राज्यस्तरावर काढण्यात आले आहेत. या अन्यायकारक आदेशाविरोधात गुरुवारी येथील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत अन्यायकारक आदेश रद्द करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हाभरात विविध पदावर कंत्राटी स्वरूपात कर्मचारी कार्यरत आहेत.या अभियानातील जिल्हा सनियंत्रण अधिकारी प्रफुल्ल रिधोरे यांच्या सेवा समाप्तीबाबतचे आदेश राज्यस्तरावरून ५ मे रोजी कुठलीही पूर्वसूचना न देता आदेश धडकल्याचे या निवेदनात म्हटले आहे. काेविड -१९ च्या संकटात कोणत्याही कर्मचारी, कामगारांना आस्थापनेवरून कमी करू नये, असे आदेश असताना कोरोना प्रतिबंध व निर्मूलनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी ही आरोग्य विभागाची असून, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पदावर असलेल्या अधिकाऱ्याला थेट मंबईतून आरोग्य विभागामार्फत हे सेवामुक्तीचे आदेश काढण्यात आले. कंत्राटी कर्मचाऱ्यांची योग्य चौकशी न करता सेवा समाप्तीचे आदेश प्राप्त झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यावर अन्याय असून याप्रकारामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. अन्यायकारक बाब लक्षात घेता सदर आदेश मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाव्दारे शासनाकडे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजू दूबे, सचिव शशिकांत तभाने, आशिष खंडेझोड, गिरीश धोटे, दीपक सहारे, नीळकंठ ढवळी, गोकुल ठाकूर व पदाधिकारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.