आता ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई

By Admin | Updated: June 22, 2016 00:07 IST2016-06-22T00:07:29+5:302016-06-22T00:07:29+5:30

जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरू असून बेधुंद वाहतुकीने निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी गंभीर दखल घेतली.

Now 'Zero Tolerance' action | आता ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई

आता ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : वर्धा जिल्ह्यात थोपविली कन्हान रेतीची वाहने
अमरावती : जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस सुरू असून बेधुंद वाहतुकीने निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या 'लोकमत'ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी गंभीर दखल घेतली. वाळूमाफियांचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार कारवाई करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील १९२ रेतीघाटांमधून दोन ब्रासपेक्षा अधिक रेतीची वाहतूक व नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेतीची १० ब्रासपेक्षा अधिक बेधूंद वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे एकाच आठवड्यात चार नागरिकांचा बळी गेला. मात्र, महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाद्वारा या वाहनांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने हे वाळूमाफिया मस्तवाल झाले आहेत. 'ओव्हरलोड' वाहतुकीमुळे वाळूघाटालगतच्या गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक गावांमध्ये तर शेतकऱ्यांना वहिवाटीचे रस्तेच उरले नाहीत. अनेक नवीन रस्त्यांची या जड वाहतुकीने पुरती वाट लागली आहे. अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीमुळे दररोज लाखोंच्या महसुलाची खुलेआम चोरी होत असताना जिल्हा प्रशासनाचे बेपर्वा धोरण चीड आणणारे होते. याविषयीचे सविस्तर वृत्त मंगळवारच्या अंकात प्रकाशित होताच महसूल यंत्रणा खडबडून जागी झाली. या वृत्ताची जिल्हाधिकाऱ्यांनी देखील गंभीर दखल घेऊन रेतीवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी व कुठलाही मुलाहिजा न करता धडक कारवाई करण्याचे निर्देश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. वाळूमाफियांची सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तिवसा येथे रात्रंदिवस तपासणी सुरु आहे. त्यातप्रमाणे सर्व तालुक्यांत भरारी पथकांनी वाळू वाहतुकीची तपासणी करून कारवाईचे आदेश देण्यात आले.

वाळूमाफियांचे धाबे दणाणले
अमरावती : भरारी पथकालादेखील कडक निर्देश देण्यात आले आहेत. मंगळवारी सकाळपासून सुरु असलेल्या महसूल विभागाच्या धडक मोहिमेमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. रेतीघाटातून येणारे प्रत्येक वाहन अगदी नियमानुसार दोन ब्रास रेती घेवून निघत आहे. कन्हान रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारी वाहने वर्धा जिल्ह्यात कारंजा परिसरात थोपवून धरली आहेत. ही वाहने छुप्या मार्गाने जिल्ह्यात प्रविष्ट होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात सर्व ठिकाणी महसूल, पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांची तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

Web Title: Now 'Zero Tolerance' action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.