आता बसस्थानकांवरही ‘सीसीटीव्ही’चा वॉच
By Admin | Updated: July 10, 2017 00:08 IST2017-07-10T00:08:15+5:302017-07-10T00:08:15+5:30
प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यासह सर्वच एसटी आगार, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

आता बसस्थानकांवरही ‘सीसीटीव्ही’चा वॉच
प्रवाशांची सुरक्षितता : परिवहनमंत्र्यांची मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यासह सर्वच एसटी आगार, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ‘सावध राहा’ ही मोहीम राबविण्यात येईल.
बसस्थानकावरील वर्दळीचा गैरफायदा घेऊन खिसेकापू, भुरटे चोर, रोडरोमिओ सक्रिय असतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन केले आहे. तसेच आगारातील कार्यशाळेत व परिसरात कर्मचाऱ्यांच्या विशेषत: महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यापैक ी एक सीसीटीव्ही थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्या कार्यालयातील माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत सहज पोहोचणार आहे. या सीसीटीव्हीवर दैनंदिन नजर ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या सुरक्षा विभागावर सोपविली आहे. परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत योजनेला मान्यता देण्यात आली.
बसस्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. याबाबत वरिष्ठस्तरावर अद्याप सूचना अप्राप्त आहेत. यासंदर्भात सूचना मिळताच अंमलबजावणी केली जाईल.
- उमेश इंगळे, आगार व्यवस्थापक
मध्यवर्ती बसस्थानक अमरावती