-आता राजकीय परीक्षा
By Admin | Updated: September 25, 2014 23:15 IST2014-09-25T23:15:22+5:302014-09-25T23:15:22+5:30
काँग्रेस - राष्ट्रवादीची १५ वर्षांपूर्वीपासून असलेली आघाडी तर भाजप-सेनेची २५ वर्षांपूर्वींची युती गुरुवारी दुभंगली. या नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे.

-आता राजकीय परीक्षा
ताटातूट : भाजप, सेना; काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार आमने-सामने
अमरावती : काँग्रेस - राष्ट्रवादीची १५ वर्षांपूर्वीपासून असलेली आघाडी तर भाजप-सेनेची २५ वर्षांपूर्वींची युती गुरुवारी दुभंगली. या नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण मिळणार आहे. स्वबळावर विधानसभा निवडणूक सर करण्यासाठी आठही मतदारसंघांत सक्षम उमेदवार असल्याचा दावा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
मागील काही दिवसांपासून आघाडी, महायुतीत जागावाटप, मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरुन घमासान सुरू होते. चर्चा, बैठकांचे सत्र सुरू असताना कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर गुरुवारी भाजपने युती तर राष्ट्रवादीने आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला. युती तुटल्याचा परिणाम जिल्ह्यात भाजप, सेनेच्या उमेदवारांवर होणार आहे. १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जनतेपुढे जाताना आता कस लागणार आहे. चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढणार असल्याने कोणाची किती राजकीय शक्ती वाढली, हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र आटोपले. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी आठही मतदारसंघांत उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी करतील, अशी माहिती आहे. जागा वाटपाचे गुऱ्हाळ संपत नसल्याने भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनीसुद्धा आठही मतदारसंघांत सक्षम उमेदवारांची चाचपणी करुन त्यांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठविली आहे. युती तुटणार, अशी कुणकुण शिवसेनेच्या नेत्यांना होती. त्यानुसार आठही मतदारसंघांत उमेदवारांच्या मुलाखतींचे सत्र आटोपले आहे.