आता ‘स्थायी’ सभापती निवडणुकीची मोर्चेबांधणी
By Admin | Updated: February 22, 2015 00:07 IST2015-02-22T00:07:59+5:302015-02-22T00:07:59+5:30
महापालिकेत शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत नव्या सभापतीपदाची निवडणूक ६ मार्चपूर्वी राबविणे आवश्यक आहे.

आता ‘स्थायी’ सभापती निवडणुकीची मोर्चेबांधणी
अमरावती : महापालिकेत शुक्रवारी सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पार पडली. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत नव्या सभापतीपदाची निवडणूक ६ मार्चपूर्वी राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रशासनाने ही निवडणूक ४ मार्चपूर्वी घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला आहे.
विद्यमान स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांच्यासह सहा सदस्यांना नैसर्गिक प्रक्रियेनुसार ६ मार्च रोजी निवृत्त व्हावे लागणार आहे. त्यामुळे नवीन सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही ६ मार्च पूर्वी आटोपणे आवश्यक आहे. हल्ली स्थायी समितीत काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना २, भाजप २, बसप १, जनविकास- रिपाइं २ अशी सदस्य संख्या आहे. या संख्याबळावर काँग्रेसचे विलास इंगोले सहजतेने निवडून येतील, असे संकेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या करारानुसार स्थायी समिती सभापतीपद हे काँग्रेसच्या वाट्याला असून ९ सदस्य संख्याबळाच्या भरवशावर इंगोले हे सभापतीपदी निवडून येतील, असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या गटनेतापदी अविनाश मार्डीकर हे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने संजय खोडके गटाला राजकीय बळ मिळाले आहे. इंगोले यांच्या नावाला सभापती म्हणून हल्ली कोणाचाही विरोध नाही. महापालिका स्थापनेपासून ज्येष्ठ सदस्य असलेले विलास इंगोले यांना स्थायी समितीच्या सभापतीपदी विराजमान करण्यासाठी माजी आ. रावसाहेब शेखावत हे आग्रही असल्याचे बोलले जाते. त्यानुसार काँग्रेसचे पक्षनेता बबलू शेखावत यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत विलास इंगोले यांची निवड अविरोध कशी होईल, यासाठी बबलू शेखावत यांनी पडद्यामागील राजकारण सुरु केले आहे. दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया कधी राबविणार, याबाबत नगरसचिव मदन तांबकेर यांना विचारणा केली असता रंगपंचमीपूर्वीच ही निवडणूक घ्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सोमवारी पाठविले जाईल, असे तांबेकर म्हणाले. स्थायी समितिच्या निवडणुकी निमित्ताने सध्या महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे. आता फक्त केवळ स्थायी समिति सभापती पदाच्या निवडणुकीच्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.