आता उरले पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:17 IST2016-12-26T00:17:23+5:302016-12-26T00:17:23+5:30

पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर त्याबँकेत भरण्यासाठी देण्यात आलेली ५० दिवसांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार आहे.

Now the remaining five days | आता उरले पाच दिवस

आता उरले पाच दिवस

लगबग : हजार-पाचशेच्या जुन्या नोटा जमा करण्याची मुदत संपणार
अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा रद्द केल्यानंतर त्याबँकेत भरण्यासाठी देण्यात आलेली ५० दिवसांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार आहे. आता अवघे पाच दिवस शिल्लक असून नोटा भरण्यासाठी बँकात पुन्हा एकदा गर्दी उसळण्याचे संकेत आहेत. सोबतच समस्त नागरिकांनी पंतप्रधानांच्या नव्या निर्णयाची धास्ती घेतली आहे.
३० डिसेंबरनंतरही देशभराबरोबर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होण्याचे चित्र नाही. ८ नोव्हेंबरला एका निर्णयाद्वारे शासनाने पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यात. तेव्हा हे रद्द झालेले चलन बदलून घेण्यासाठी बँकांना ३० डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. याकालावधीत जिल्हाभरातील बँकांमध्ये २ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम पाचशे आणि हजारांच्या चलनात जमा झाली आहे.
नोटाबंदीनंतर बँकाचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून ‘कॅश शॉर्टेज’चा प्रश्न कायम आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी व्यवहार सुरक्षित होण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. एकीकडे ‘कॅशलेस’ व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात असले तरी दुसरीकडे त्यासाठी असणारी व्यवस्था तोकडी असल्याने ही घोषणाही प्रत्यक्षात कुचकामी ठरली आहे.
जिल्ह्यात खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३३१ शाखा आहेत. यातील स्टेट बँक सोडल्यास सर्वच बँकांमध्ये ‘कॅश’ची समस्या आहे. त्यातही स्टेट बँकेतही ‘कॅश शॉर्टेज’चा प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडाभरातून २४ हजारांचा विड्रॉल देणे अनेक बँकांना अद्यापही साध्य झाले नाही. यातच शेवटच्या पाच दिवसांत जुने चलन भरण्यासाठी गर्दी वाढणार असल्याने बँकांमधील व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे. नागरिकांमध्ये अद्यापही चलनटंचाईची भीती कायम आहे. (प्रतिनिधी)

५०० आणि १०० चे चलन पोहोचले
शहराच्या अनेक एटीएममध्ये ५०० आणि १०० चे चलन पोहोचल्याची सुखावह गोष्ट घडली आहे. आतापर्यंत एटीएममधून नव्या चलनातील २ हजारांची एकच नोट मिळत असल्याने नागरिक हैराण होते. मात्र, रविवारी अनेक एटीएममधून १०० च्या नोटांच्या चलनामध्ये नागरिकांना रक्कम काढता आली.

कितीही नोटा स्वीकारणार
५०० आणि १००० च्या जुन्या नोटा केवळ पाच हजार रुपयांच्या मर्यादेत स्वीकारणार असल्याचा निर्णय आरबीआयने घेतला होता. मात्र तो निर्णय बदलण्यात आला आहे.
 

Web Title: Now the remaining five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.