आता खासगी एजन्सी करणार पाणी बिल वसुली
By Admin | Updated: July 1, 2015 00:37 IST2015-07-01T00:37:35+5:302015-07-01T00:37:35+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता पाणी बिलांची वसुली खासगी एजन्सीमार्फत करणार आहे.

आता खासगी एजन्सी करणार पाणी बिल वसुली
वसुली वाढविण्याचे प्रयत्न : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा निर्णय
वैभव बाबरेकर अमरावती
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आता पाणी बिलांची वसुली खासगी एजन्सीमार्फत करणार आहे. वसुली वाढविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शहरात सुमारे ८० हजार ग्राहक असून दरवर्षी ३० कोटींच्या जवळपास वसुली केली जाते. आतापर्यंत ग्राहकांवर जवळपास २० कोटींची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवन प्राधिकरणचे उत्पन्न व खर्च बघता दोन्ही जवळपास सारखेच असल्याचे निदर्शनास आले आहे. जीवन प्राधिकरणचे कर्मचारी ग्राहकांच्या घरी जाऊन पाणीमीटरचे रिडिंग घेतात. मात्र, त्या तुलनेत वसुली कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता खासगी एजन्सीमार्फत रिडिंग व वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी एजन्सीज जीवन प्राधिकरणने दिलेल्या नियमावलीनुसार मीटर रिडिंग व वसुली करणार आहे. आतापर्यंत केवळ रिडिंग घेऊन ग्राहकांना बिले पाठविण्यात येत होती. मात्र, आता विद्युत मीटरप्रमाणेच पाणीमीटरचे छायाचित्र काढण्याचे निर्देश खासगी एजन्सीला देण्यात आले आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून लवकरच खासगी एजन्सीमार्फत बिल रिडिंग व वसुली सुरु करण्यात येणार आहे.
पाणी बिलांची मुद्दल नागरिकांनी भरल्यास बिलावरील व्याज माफ करणारी निर्भय योजना ३१ जुलैपर्यंत राबविण्यात येत आहे.