आता महापालिका शिक्षकांंना महापुरुषांच्या नावे शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:38+5:302021-02-05T05:28:38+5:30
अमरावती : महापालिका शाळांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून महापुरुषांच्या नावे शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात ...

आता महापालिका शिक्षकांंना महापुरुषांच्या नावे शिक्षक पुरस्कार
अमरावती : महापालिका शाळांच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून महापुरुषांच्या नावे शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या ५ सप्टेंबर शिक्षक दिनी हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे.
त्याकरिता शिक्षण सभापती आशिष गावंडे यांनी पुढाकार घेतला आहे. महापुरुषांच्या नावे शिक्षकांना पुरस्कार बहाल करणारी एकमेव अमरावती महापालिका ठरणार आहे.
महापालिकेत नुकतीच शिक्षण समितीची सभा पार पडली. यात शिक्षकांचे कर्तव्य, जबाबदारीविषयी चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या शाळांचे शिक्षण, दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबतही मंथन झाले. मात्र, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या शिक्षकांचा गौरव आणि त्यांच्या शैक्षणिक कार्याचे मूल्यमापन व्हावे, यासाठी सांगोपांग चर्चा झाली. राष्ट्रीय, राज्य स्तरावर शिक्षकांना उत्कृष्ट किंवा आदर्श पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यानुसार महापलिका स्तरावर शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण कर्तव्यासाठी महापुरुषांच्या नावे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला सर्वानुमते शिक्षण समितीच्या सदस्यांनी मान्यता प्रदान केली. शिक्षण सभापती आशिष गावंडे यांनी महापालिकेच्या शाळेमध्ये नावीन्यपूर्ण बद्दल घडवून आणून शाळेचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याचे संकल्प घेतला. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा ६६ शाळा आहेत.
---------------------------------
या नावाने दिला जाईल शिक्षकांना पुरस्कार
- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार
- माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आदर्श शिक्षक पुरस्कार
----------------------------------
शिक्षकांचे समाजाप्रति असलेले उत्तरदायित्व लक्षात घेता त्यांच्या कार्याचा गौरव होणे अभिप्रेत आहे. त्याकरिता शिक्षकांना महापुरुषांच्या नावे शिक्षक पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी हा पुरस्कार बहाल केला जाईल.
- आशिष गावंडे, सभापती, शिक्षण समिती, महापालिका.