- आता 'मिनी वाईनबार'वर पोलिसांची करडी नजर
By Admin | Updated: August 25, 2014 23:41 IST2014-08-25T23:41:14+5:302014-08-25T23:41:14+5:30
शहरातील अंडी विक्रीच्या नावाखाली दारू पिणाऱ्यांची सोय करणाऱ्या हातगाड्यांविरुध्द पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी कारवाईचे आदेश दिले असून यापुढे या गाड्या पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत.

- आता 'मिनी वाईनबार'वर पोलिसांची करडी नजर
अमरावती : शहरातील अंडी विक्रीच्या नावाखाली दारू पिणाऱ्यांची सोय करणाऱ्या हातगाड्यांविरुध्द पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी कारवाईचे आदेश दिले असून यापुढे या गाड्या पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत.
‘हातगाड्या की मिनीवाईन बार’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशीत करताच पोलीस आयुक्तांनी या वृत्ताची तातडीने दखल घेतली.
शहरातील अनेक भागात रस्त्याच्या कडेला अथवा खुल्या जागेवर अंडी विक्री करणाऱ्या हातगाड्या सायंकाळी ग्राहकांच्या सेवेत रूजू होतात. या हातगाड्यांभोवती दारू पिणाऱ्यांचीच खरी गर्दी असते. हातगाडीचालक परिसरातच दारू पिण्यासाठी खुबीने व्यवस्था उपलब्ध करून देतो. काही अंड्यांच्या हातगाड्यांवर मटन करी व जेवनाची व्यवस्थाही आहे. याचाच फायदा घेत मद्यपी अशा हातगाड्यांना पहिली पसंती दर्शवून बिनधोकपणे दारू रिचवितानाचे चित्र रात्री पहावयास मिळते. काही हातगाड्यांवर तर उशीरा अथवा ‘ड्राय डे’ला दारू विक्री होत असल्याचे यापूर्वीच्या पोलीस कारवाईतूनही स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ठळकपणे पुराव्यानिशी वृत्त प्रकाशीत करताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी या वृत्ताची दखल घेत अशा हातगाड्यांविरुध्द तातडीने कारवाईचे आदेश सर्व पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेता केवळ अंडी विक्रीच्या हातगाड्यांना लक्ष्य करणे कठीण जाते. यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणेही गरजेचे आहे, असा सल्लाही मेकला यांनी नागरिकांना दिला आहे. सणासुदीमुळे तीन विशेष पोलीस पथक तयार केले असून कारवाईचा सपाटा सुरु केला आहे.