आता गोवंश हत्या करणाऱ्यांची खैर नाही
By Admin | Updated: July 26, 2016 00:27 IST2016-07-26T00:27:23+5:302016-07-26T00:27:23+5:30
चांदूरबाजार येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर शहरातील बडनेरा व नागपुरी गेट हद्दीतील काही ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन चालविले जाईल.

आता गोवंश हत्या करणाऱ्यांची खैर नाही
विशेष पथक तयार : बडनेरा, नागपुरी गेट हद्दीत कोम्बिंग आॅपरेशन
अमरावती : चांदूरबाजार येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर शहरातील बडनेरा व नागपुरी गेट हद्दीतील काही ठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन चालविले जाईल. यासाठी पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वात तीन पथके गस्त घालणार आहेत. त्यामुुळे आता शहरात गोवंश हत्या करणाऱ्यांची खैर नाही, असे चित्र दिसून येत आहे.
खरवाडीतील भीषण अपघात गोवंशाची अवैध वाहतुकीमुळे घडला आहे. त्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलीस विभाग सतर्क झाला आहे. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने गोवंश हत्या करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल. याकरिता नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील लालखडी, गुलिस्ता नगर, जमील कॉलनी, गवळीपुरा, कमेला ग्राऊंड व बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चमन नगर, अलमास नगर, नवी वस्ती, बैल बाजार या नऊ ठिकाणी हे कोम्बिंग आॅपरेशन चालविले जाणार आहे. या कोम्बिंगसाठी एक पीएसआय व चार कर्मचारी असे शस्त्रधारी पथक तीन पाळीत कोम्बिंग गस्त घालणार आहे. या पथकावर पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त नियंत्रण राहणार आहे. हे पथक वरील दिलेल्या परिसरात गस्त घालून गोवंश हत्या व वाहतुकीसंदर्भात लक्ष ठेवून तत्काळ कारवाई करणार आहे. त्यामुळे आता गोवंश हत्या करणाऱ्याची खैर नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे.
पथकांवर 'वॉच'
गोवंश हत्या थांबविण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाने कोम्बिंग आॅपरेशनसाठी तीन पाळीत पथके सज्ज केली आहेत. या पथकाचे कामकाजावर पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्त लक्ष ठेवणार आहे. या कोम्बींग आॅपरेशनदरम्यान पोलिसांनी कामचुकारपणावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
एसीपी करणार दिवसाआड कारवाई
गोवंश हत्या व वाहतुकीसंदर्भात एसीपींचे एक पथक दिवसाआड कोम्बिंग आॅपरेशन राबविणार आहे. यामध्ये आरसीपी जवानाची मदत घेतली जाईल. नागपुरी गेट हद्दीत एसीपी चेतना तिडके व फे्रजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसीपी रियाजुद्दीन देशमुख यांच्या नेतृत्वात हे कोम्बिंग आॅपरेशन राबविले जाणार आहे.