आता हॉकर्स झोनची अंमलबजावणी झोनस्तरावर
By Admin | Updated: July 16, 2014 23:51 IST2014-07-16T23:51:18+5:302014-07-16T23:51:18+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिका हद्दीत हॉकर्स झोन निर्माण करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

आता हॉकर्स झोनची अंमलबजावणी झोनस्तरावर
अमरावती: सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिका हद्दीत हॉकर्स झोन निर्माण करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. त्याकरिता उपसमिती गठित करण्यात आली असून २३ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महानगरात रस्त्याच्या कडेला किंवा गर्दीच्या ठिकाणी हातगाडी, ठेले व किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना वाहतुकीस अडथळा न होता स्वतंत्रपणे व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करणे अपेक्षित आहे. यापूर्वी हॉकर्स झोन निर्माण करण्यासंदर्भात अनेकदा बैठका झाल्या आहेत. मात्र आचारसंहिता आणि प्रशासनाच्या दिरंगाईने हॉकर्स झोन वेळेत निर्माण झाले नसल्याचे चित्र आहे. हॉकर्स झोन निर्माण करुन ते नियमानुसार व्यवसायिकांना उपलब्ध करुन द्यावे,याकरिता गत आठवड्यात मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपायुक्त रमेश मवासी यांनी हॉकर्स झोन निर्माण करण्याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या लेखाजोखा सादर केला. जागेची अडचण, वाहतुकीची समस्या, अपघात होणारी स्थळे, जनतेला होणारा त्रास आदी विषयांची बाजू प्रशासनाने मांडली. दरम्यान प्रशासनाने पोलीस विभागासोबत बैठक घेऊन काही स्थळे निश्चित केली आहेत. या स्थळांवर हॉकर्स झोन निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या पाचही झोनमध्ये उपसमिती गठीत करण्याचे ठरविण्यात आले आहे. झोन निश्चित झाल्यानंतर त्याला अंतिम मंजुरीचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहे. हॉकर्स झोन निर्मितीचा विषय लांबणीवर पडल्याने प्रशासनाला आता हॉकर्सना न्याय देण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्याकरिता २३ जुलै रोजी उपसमितीची बैठक होत आहे.