आता कचोरीत गुटखा पाऊच
By Admin | Updated: September 27, 2016 00:07 IST2016-09-27T00:07:40+5:302016-09-27T00:07:40+5:30
गाडगेनगर परिसरातील ‘स्क्वेअर लिंक’ मार्केटस्थित शांती रिफ्रेशमेंटमधील कचोरीत आता चक्क तळलेला गुटख्याचा पाऊच आढळून आल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आता कचोरीत गुटखा पाऊच
‘शांती रिफ्रेशमेंट’मधील प्रकार : खाद्यान्न प्रतिष्ठानांमधील अनागोंदी चव्हाट्यावर
अमरावती : गाडगेनगर परिसरातील ‘स्क्वेअर लिंक’ मार्केटस्थित शांती रिफ्रेशमेंटमधील कचोरीत आता चक्क तळलेला गुटख्याचा पाऊच आढळून आल्याने ग्राहकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहरातील खाद्यान्न प्रतिष्ठानांमध्ये एकामागोमाग एक उघडकीस येणारे हे प्रकार पाहून सामान्य ग्राहक पार चक्रावून गेलाय. नेमके खायचे तरी काय, आणि कोणाच्या विश्वासावर, असा प्रश्न उपस्थित होतोय. तूर्तास कचोरीमध्ये आढळलेल्या गुटखा पाऊचची तक्रार ग्राहक नानासाहेब वानखडे यांनी अन्न व औषधी प्रशासनाकडे नोंदविली आहे.
न्यू सुरभी कॉलनीतील रहिवासी नानासाहेब देवीदास वानखडे यांचे वडील लाहोटी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. शनिवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ते वडिलांना दवाखान्यात भेटण्याकरिता गेले. याच दरम्यान त्यांची मुलगी धनश्रीने नाश्ता आणण्याचे ठरविले. ती दुचाकी घेऊन गाडगेनगर परिसरातील ‘स्क्वेअर लिंक’ मार्केटमधील ‘शांती रिफे्रशमेंट’मध्ये गेली. तीने हॉटेल संचालकाला १० रुपये देऊन एक प्लेट कचोरीचे पार्सल घरी नेले. कचोरी खात असताना धनश्री खात असलेल्या कचोरीत गुटख्याचा पाऊच आढळून आला. हे पाहून तिला किळस दाटून आली आणि मळमळू लागले. काही वेळातच उलट्यादेखील सुरू झाल्या. वडिलांनी धनश्री खात असलेली कचोरी न्याहाळून बघितली असता त्यांनाही कचोरीच्या आत चिटकून बसलेला गुटख्याचा पाऊच आढळून आला. हा प्रकार बघताच त्यांना संताप आला आणि त्यांनी ती अर्धवट खाल्लेली कचोरी घेऊन थेट ‘शांती रिफे्रशमेंट’गाठले. मात्र, रात्री ९.१५ वाजताची वेळ असल्याने ते प्रतिष्ठान बंद झाले होते. परिणामी त्यांची दुकानाच्या संचालकासोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी गुटखा पाऊच असलेली कचोरी जपून ठेवली. व दुसऱ्या दिवशी नानासाहेब यांच्या वडिलांना हॉस्पिटलमधून सुटी मिळणार असल्याने दिवसभर ते दिवसभर व्यस्त होते. रविवारी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाला सुटी असल्याने ते तक्रार करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी सोमवारी एफडीएचे कार्यालय गाठून ‘शांती रिफ्रेंशमेंंट’विरुद्ध तक्रार नोंदविली. अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली. गेल्या काही दिवसांत शहरातील खाद्यान्न प्रतिष्ठानांमधील अनागोंदीचे प्रकार एका पाठोपाठ एक चव्हाट्यावर येत आहेत. कचोरीत अळी, चिवड्यात पाल आणि आता कचोरीत चक्क गुटखा पाऊच आढळून आला. (प्रतिनिधी)
कचोरी जप्त न करता ग्राहकाला केली परत
कचोरीमध्ये गुटख्याचा पाऊच आढळून आल्यानंतर एफडीएकडे तक्रार करण्याकरिता गेलेल्या नानासाहेब वानखडे यांना विचित्र अनुभव आला. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार तर नोंदवून घेतली. मात्र, त्यांनी कचोरीचा तो गुटखा पाऊच असलेला नमूना जप्त करून न घेता ग्राहकालाच परत केला. यावरून खाद्यान्न प्रतिष्ठानांमध्ये आढळून येणाऱ्या गैरप्रकारांबाबत अन्न, औषधी प्रशासन विभाग किती गंभीर आहे, हे दिसून येते. शहरात ग्राहकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा होत असताना एफडीएला त्याचे पाहिजे तसे गांभीर्य नाही, हीच बाब यातून अधोरेखित होते.
कचोरीत गुटखा पाऊच आढळल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ती कचोरी जप्त करण्यात आली असून संबंधित हॉटेलच्या तपासणीसाठी अधिकारी गेले आहेत. तपासणीनंतर तेथील खाद्यान्नाचे नमुने घेतले जातील किंवा नोटीस बजावण्यात येईल.
- विश्वजित शिंदे,
अन्न, सुरक्षा अधिकारी.
आजपर्यंत अनेक ग्राहकांनी आमच्याविरुद्ध विविध कारणाने तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे आणखी तक्रार होणे अपेक्षित आहे. आमच्याकडे दररोज शेकडो ग्राहक येतात. त्यामुळे कुणीपण आरोप करू शकतो.
- नरेश साहू,
संचालक, शांती रिफ्रेशमेंट