‘सुपर स्पेशालिटी’मध्ये आता मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया
By उज्वल भालेकर | Updated: June 21, 2023 18:56 IST2023-06-21T18:56:13+5:302023-06-21T18:56:44+5:30
कोट्यवधी रुपयांची आधुनिक कॅथलॅब कार्यान्वित, आज होणार प्रात्याक्षिक

‘सुपर स्पेशालिटी’मध्ये आता मोफत हृदयविकार शस्त्रक्रिया
अमरावती : शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लवकरच हृदयविकाराच्या रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. याठिकाणी कोट्यवधी रुपयांची आधुनिक तंत्रज्ञान असलेली कॅथलॅब कार्यान्वित करण्यात आली आहे. या कॅथलॅबची वैद्यकीय तज्ज्ञांकडून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस प्रात्यक्षिक (डेमो) होणार असून जुलै महिन्यातील पहिल्याच आठवड्यात ही लॅब रुग्णांच्या सेवेत सुरु होणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
धावपळीच्या युगात बदलेल्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये ह्रुदयविकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणवयातच ह्रुदयविकारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्रुदयविकाराच्या रुग्णांना खासगीमध्ये महागडे उपचार घ्यावे लागतात. परंतु आता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे.
याठीकाणी साडेपाच कोटी रुपयांची कॅथलॅब कार्यान्वित करण्यात आली असून अमरावती विभागातील पहिलीच शासकीय कॅथलॅब आहे. या आधुनिक कॅथलॅबमुळे ह्रुदयविकाराच्या रुग्णांवर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेंटिंग, व्हॉल्वाटॉमी तसेच पेसमेकर बसविणे शक्य होणार आहे. ही यंत्रणा संपूर्णपणे संगणकावर चालणारी असून हृदयातील अंतर्गत भागातील रक्तवाहिन्यांच्या प्रतिमा सुस्पष्टपणे दिसणार असल्यामुळे डॉक्टरांना उपचार करण्यातही मोठी मदत होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी दिली.