आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’
By Admin | Updated: May 2, 2015 00:33 IST2015-05-02T00:33:30+5:302015-05-02T00:33:30+5:30
खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, ....

आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’
पुस्तकावर शिक्के : पालकमंत्र्यांची खरीप आढावा बैठकीनंतर पत्रपरिषद
अमरावती: खतांचा काळाबाजार, साठवण आणि उगवणशक्ती असलेले बियाण्यांची विक्री होत आहे की नाही, याच्या तपासणीसाठी आता कृषी केंद्राची ‘क्रॉस चेकिंग’ केली जाईल. आॅनलाईन खरेदीची सत्यता, पावती पुस्तकावर शिक्के मारण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान काही उणीवा आढळल्यास ते कृषी केंद्र कायमचे बंद करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी येथे शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर त्यांनी सविस्तर माहिती दिली. ना. पोटे यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर आढावा बैठकीत भर देण्यात आला आहे. त्यांना वेळीच बियाणे, खत उपलब्ध करुन देण्यासाठीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. खरीप हंगामापूर्वी माती परीक्षण, बियाण्यांची उगवणशक्ती तपासणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.
पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी हीदेखील प्रसिद्ध केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खतांचा पुरवठा केला जाईल. जिल्ह्यासाठी १६ मॅट्रिक टन युरियाची मागणी केली जात असून ती नक्कीच पूर्ण होईल, अशी श्वावती पोटे यांनी दिली. मातीचा पोत तपासूनच पेरणी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
खरीप हंगामात कृषी केंद्रावर काही भानगडी अथवा शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यास कृषी अधिकाऱ्यांची खैर राहणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. कृषी केंद्राच्या तपासणीकरीता तालुकानिहाय तपासणी पथक असून हे पथक अधिक गतीमान कसे होईल, यावर सर्वाधिक भर देण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत.
बनावट बियाण्यांची विक्री करण्याचा गोरखधंदा रोखण्यासाठी पावती पुस्तक लक्ष्य करण्यात आले असून या पुस्तकावर कृषी विभागाचा शिक्का असल्याशिवाय ते ग्राह्य धरले जाणार नाही, असे ते म्हणाले.
पावतीशिवाय बियाण्यांची खरेदी करु नये
कृषी केंद्रातून बियाणे अथवा खत खरेदी करताना पावती घेतल्याशिवाय ते खरेदी करुन नये, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी समस्त शेतकऱ्यांना केले आहे. एकाद्या वेळी बियाण्यांची उगवण झाली नाही तर त्या कृषी केंद्रावर शासन स्तरावर कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे कृषी केंद्रातून साहित्याची खरेदी करताना बीलाची पावती घेवूनच ते दुकान सोडावे, असे ते कडकडीचे आवाहन त्यांनी केले.
बियाणे खरेदीची सक्ती केल्यास परवाने रद्द करु
दरवर्षी कृषी केंद्राचे संचालक अमूक बियाणे खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांना करतात. लिंकिंग पद्धतीने ते खरेदी करावेच लागते, अशा भूलथापा देऊन निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारतात. मात्र, यंदा असा प्रकार निदर्शनास आल्यास त्या कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरुपी बंद करु, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. सोयाबीन बियाणे चांगल्या दर्जाचे असल्याची माहिती त्यांनी दिली.