अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने प्राचार्यांना स्वत:च्या सेवापुस्तिकेचे प्रमाणन व निवृत्तिवेतन (पेन्शन) बाबत विविध प्रस्ताव पाठविण्याचा अधिकृत अधिकार बहाल करणारा विनियम क्र. २१/२०२५ ला मान्यता दिली असून, तसा विनियम विद्यापीठाने ३० एप्रिल रोजी राजपत्रात प्रसिद्ध केला आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांनी यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. या आधी प्राचार्यांना त्यांच्या स्वत:च्या सेवापुस्तिकेचे प्रमाणन व निवृत्तिवेतनसंबंधी प्रस्ताव सादर करण्यास कोणतेही स्पष्ट नियम नव्हते. नवीन विनियमानुसार प्राचार्य स्वत:च्या सेवापुस्तिकेतील नोंदीचे प्रमाणन करून संबंधित प्रस्ताव सहसंचालक, उच्चशिक्षण कार्यालयाकडे थेट सादर करू शकतील. प्राचार्य हे महाविद्यालयांचे कार्यकारी व शैक्षणिक प्रमुख असल्याने त्यांना आर्थिक व्यवहारात ‘ड्रॉइंग ॲण्ड डिस्बर्लिंग ऑफिसर’ म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे त्यांना स्वत:च्या तसेच इतर कर्मचारी सेवापुस्तिकांचे व्यवस्थापन व प्रस्ताव सादर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या विनियमामुळे प्राचार्यांचे कार्य अधिक पारदर्शक व सुलभ होणार असून, विविध शासकीय बाबींमध्ये विलंब होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
अधिसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण
विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुकीमध्ये प्राचार्य वर्गवारीत पॅनल निवडणूक लढविताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ. आर. डी. सिकची यांनी सर्व प्राचार्य मतदारांना याबाबत आश्वासन दिले होते. त्यांनी सिनेट निवडणुकीच्या जाहीरनाम्यात प्राचार्यांच्या सेवा संरक्षित केल्या जातील आणि प्राचार्यांना वैधानिक कवचकुंडल प्रदान करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले होते.
प्राचार्यांना सेवेत कवचकुंडल
प्राचार्यांना अधिकार प्रदान करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयामुळे सेवेत कवचकुंडल मिळाले आहे. यासाठी सर्व प्राचार्य गेली कित्येक वर्ष वाट पाहत होते. परंतु डॉ. सिकची यांनी याबाबत व्यवस्थापन परिषदेत तसा ठराव सादर केला होता. त्या ठरावास सर्व सन्माननीय व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी सहमती दर्शविली. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय पारित होऊ शकला, हे विशेष.
प्राचार्य व शिक्षकांच्या बेकायदेशीर निलंबनाविरुद्ध लढाई महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांचे व्यवस्थापनाकडून बेकायदेशीरपणे निलंबन केले जाते. अनेकवेळा कुठलेच कारण वा चूक नसते. परंतु मनमानीपणे निलंबनासारख्या अनेक घटना घडल्या आहेत. व्यवस्थापनाच्या बेकायदेशीर मनमानीला चाप बसावा आणि यापुढे कुठल्याही महाविद्यालयातील प्राचार्य असो वा शिक्षक यांचे बेकायदेशीरपणे निलंबन होऊ नये, यासाठी डॉ. आर. डी. सिकची लढा उभारणार आहेत.