आता बनावट बियाणे नियंत्रणासाठी मोहीम
By Admin | Updated: May 11, 2015 23:56 IST2015-05-11T23:56:39+5:302015-05-11T23:56:39+5:30
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर ....

आता बनावट बियाणे नियंत्रणासाठी मोहीम
सतर्कता : कृषी आयुक्तांचे कृषी विकास अधिकाऱ्यांना निर्देश
अमरावती : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बनावट बियाणे बाजारात आणून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार नेहमीच समोर येतो. यंदा शासनाने बनावट बियाण्याची विक्री करणाऱ्याविरुद्ध मोहीम उघडलेली दिसते. जिल्हास्तर, तालुकास्तरावर बनावट बियाण्यांचा छडा लावण्यासाठी पथके तयार करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहेत.
मागील वर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. परंतु बियाण्यांची उगवण वेळीच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागला. कर्ज काढूनही शेतकरी संकटातून बाहेर पडू शकला नाही. यावेळी तसे होऊ नये, म्हणून शासन गंभीर दिसत आहे. बनावट बियाणे तयार करणारी यंत्रणा हंगामाच्या वेळी सक्रिय होते. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी बियाणे कंपन्यांवर असताना चुकीचा मार्ग अनुसरला जातो. दरवेळी काही विक्रेते पकडले जातात. बियाणे जप्त कले जाते. तरीही बेमुर्वतपणा संपत नाही. शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासोबतच बियाणे उत्पादकांनीसुद्धा हातभार लावावा. शेतकऱ्यांची परीक्षा घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. यावर नियंत्रण ठेवणारी पथके व्हावी, त्यामुळे बनावट बियाणे करणाऱ्यांना धडा शिकविले जाईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने तालुका समित्या कार्यरत असतानच केवळ हंगामात नाहीतर त्यांचे कार्य वर्षभर सुरू असते. फरक इतकाच की खरीप, रबी हंगामात शेतकऱ्यांची लुबाडणूक होऊ नये म्हणून अधिकची सतर्कता बाळगली जाते. यावेळीही आम्ही पूर्ण शक्तीनिशी यंत्रणा सज्ज केली आहे.
बनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल करा
बनावट बियाणे उत्पादकांवर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी कृषी विभागाला दिले आहेत. शेतकऱ्यांच्या माथी चुकीचे बियाणे लादणाऱ्यांची मुळीच गय करु नका, असे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने कृषी आयुक्त कार्यालयाने सतर्कतेच्या सूचना दिल्या.
बोगस बी-बियाणे विकण्याच्या प्रकारांना आळा घालणे ही कृषी विभागाची जबाबदारी आहे. असा प्रकार करण्यावर प्रत्येक तालुकास्तरावर विशेष पथक तैनात आहे. असे प्रकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
-उदय काथोडे,
कृषी विकास अधिकारी