आता जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:16 IST2020-12-30T04:16:50+5:302020-12-30T04:16:50+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समित्यांच्या दोन अशा चार रिक्त पदांच्या निवडणुकीची लगबग आता सुरू झालेली आहे. ...

आता जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकांची लगबग
अमरावती : जिल्हा परिषदेच्या दोन व पंचायत समित्यांच्या दोन अशा चार रिक्त पदांच्या निवडणुकीची लगबग आता सुरू झालेली आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
जिल्ह्यात वरूड तालुक्यातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या बेनोडा गटाचे सदस्य देवेंद्र महादेवराव भुयार व दर्यापूर तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या गायवाडी गटाचे सदस्य बळवंत वानखडे हे विधान परिषदेवर निवडून आल्याने २५ ऑक्टोबर २०१९ रोजी ही दोन्ही पदे रिक्त झाली. या पदांची मुदत २० मार्च २०२० रोजी संपुष्टात येत आहे.याशिवाय अचलपूर पंचायत समिती अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कांडली पंचायत समिती गणाच्या सदस्य वीणा ठाकरे यांना १३ जानेवारी २०२० च्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केल्यामुळे पद रिक्त झाले. या पदाची मुदत १३ मार्च २०२२ पर्यंत आहे. अमरावती तालुक्यातील वलगाव पंचायत समितीच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागेवरील सदस्य वहिदाबी युसूफ शाह यांचा २६ नोव्हेंबर २०२० रोजी मृत्यू झाल्यामुळे पद रिक्त झाले. या पदाची मुदतदेखील १३ मार्च २०२२ पर्यंत बाकी आहे.
जिल्ह्यातील या रिक्त पदांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाने मागितला होता. आता जिल्हा निवडणूक विभागाने हा अहवाल आयोगाला पाठविल्याने लवकरच निवडणुकीसंदर्भात प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
जुना धामणगावचे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत
जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषदेच्या जुना धामणगाव गटाच्या सदस्य वैशाली बोरकर यांना ३० नोव्हेंबर २०१९ च्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांनी अनर्ह ठरविले आहे. यावर त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाद मागितली असता, अंतरिम आदेशान्वये १० डिसेंबर २०१९ ला स्थगिती देण्यात आल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.
बॉक्स
सातनूर गणासाठी रीट पीटिशन
वरूड पंचायत समितीमधील सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या सातनूर गणाच्या सदस्य चैताली ठाकरे यांना ६ ऑगस्ट २०१८ चे आदेशान्वये विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे. या पदाची मुदत १३ मार्च २०२२ पर्यंत बाकी आहे. ठाकरे यांनी नागपूर उच्च न्यायालयात रीट पीटिशन दाखल केले आहे. या न्यायालयीन प्रक्रियेमुळे येथील पोटनिवडणुकीची प्रक्रिया थांबली असल्याचे सांगण्यात आले.