अनधिकृत वापराच्या जागाधारकांना नोटीस

By Admin | Updated: March 9, 2015 00:41 IST2015-03-09T00:41:28+5:302015-03-09T00:41:28+5:30

नझूल आणि अभिन्यासच्या जागा वापराचे मूळ स्वरुप न ठेवता ते परस्पर बदलवून जागेचा वापर

Notice to unauthorized use of landlords | अनधिकृत वापराच्या जागाधारकांना नोटीस

अनधिकृत वापराच्या जागाधारकांना नोटीस

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : दीड कोटी दंड वसुलीचे 'लक्ष्य'
अमरावती :
नझूल आणि अभिन्यासच्या जागा वापराचे मूळ स्वरुप न ठेवता ते परस्पर बदलवून जागेचा वापर करणाऱ्या मालमत्तेची शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अमरावती तहसील अंतर्गत ९८ प्रकरणे निदर्शनास आली असून या सर्व मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आठ दिवसांच्या आत दंड भरुन ते नियमानुसार न केल्यास या मालमत्ता सील केल्या जातील, असे नोटीसमध्ये नमूद आहे.
महसूल विभागाने नझूल आणि अभिन्यासातील जमिनीला लक्ष्य केले आहे. बहुतांश नागरिकांनी कृषक जमिनीवर हॉटेल्स, मॉल्स, ढाबे, संकुल, मंगल कार्यालये, दवाखाने साकारले आहेत. ही बाब नियमांना विसंगत आहे. अनेकांनी कृषक जमिनीचा परस्पर वापर करुन शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. परिणामी अनधिकृत वापराच्या जागेची शोधमोहीम घेत त्या अधिकृत करुन घेण्यासाठी दंडात्मक कारवाईचा नियम लागू करण्यात आले आहे. जमीन महसूल अधिनियमानुसार अनधिकृत वापराच्या जमिनी अधिकृत करण्यासाठी ४० टक्के दंडाची आकारणी केली जाते. दंड वसुलीचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले आहेत. कृषक जमिनींच्या वाणिज्य वापरात बदल झाल्यास दंडात्मक रक्कम वसूल करण्यासाठी मालमत्ताधारकांना नोटीस बजावून दंड भरण्यास कळविण्यात आले आहे. नोटीस मिळाल्यानंतर आठ दिवसात ४० टक्के दंडाची रक्कम भरुन मालमत्ता अधिकृत करुन घेणे अपेक्षित आहे. अन्यथा, या मालमत्तांना टाळे लावले जाईल. नझूल क्षेत्रातील अनधिकृत जागा वापराची कार्यवाही उपविभागीय अधिकारी तर अभिन्यासातील अनधिकृत जमिनीच्या वापराबाबतची कारवाई तहसीलदार करतील, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आतापर्यंत ९८ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात नझूलला ६० लाख तर अभिन्यासातील मालमत्तांना ९० लाख दंड वसुलीचे लक्ष्य दिले आहे. त्यानंतर महसूल विभाग या मालमत्तांवर बोझा चढवून ती ताब्यात घेण्याची कारवाई करेल. त्यामुळे कृषक जमिनींचा परस्पर वाणिज्य वापर करणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

९८ मालमत्ताधारकांना नोटीस
अमरावती तहसीलअंतर्गत जागांचा परस्पर अनधिकृत वापर करणाऱ्या ९८ मालमत्ताधारकांना दंडात्मक कारवाईबाबत नोटीस बजावण्यात आली आहेत. यात मॉल्स, हॉटेल्स, संकुल, मंगल कार्यालये, दवाखाने, शोरुम, कापडाची बाजारपेठ, कारखाने आदींचा समावेश आहे.
जमिनींचा परस्पर वापर करता येत नाही. महसूल अधिनियमानुसार कृषक जमीन अकृषक करुन वापर करावा लागतो. मात्र, काहींनी परवानगी न घेता जमिनीचा वाणिज्य वापर करणे सुरु केले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत जागा वापराची शोधमोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. सदर मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे.
- सुरेश बगळे, तहसलीदार, अमरावती.

Web Title: Notice to unauthorized use of landlords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.