वृक्ष लागवड नव्हे, हे तर मिशन!
By Admin | Updated: June 23, 2016 00:08 IST2016-06-23T00:08:36+5:302016-06-23T00:08:36+5:30
राज्यात १ जुलै रोजी या एकाच दिवशी लोकसहभागातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प घेतला आहे.

वृक्ष लागवड नव्हे, हे तर मिशन!
पत्रपरिषद : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
अमरावती: राज्यात १ जुलै रोजी या एकाच दिवशी लोकसहभागातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प घेतला आहे. वृक्ष लागवड, हे ईश्वरीय कार्य असून ते मिशन म्हणून राबविणार अशी माहिती राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सोमवारी दिली.
ना. मुनगंटीवार हे १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यासाठी आले असता ते पत्रपरिषदेत बोलत होते. वनविभागाने एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. भविष्यात ‘गाव तेथे नर्सरी, तालुका तेथे स्मृती वन’ साकारुन वनाच्छादित परिसर निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाने सिंचन क्षमता वाढीस लावण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची पायाभरणी केली असून याच धर्तीवर ‘वनयुक्त’ योजना राबविली जाईल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. वृक्ष लागवडीचा प्रसार, प्रचार जोरात सुरु असला तरी ही योजना कागदावरच न थांबता हजारो लोकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पडतो. १ जुलै रोजी शासकीय कर्मचाऱ्यांना दुपारी १ वाजेपर्यत वृक्ष लागवडीत सहभागी होण्याचे शासन आदेश निर्गमित केले जाणार असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.
‘सेल्फी विथ ट्री’ संकल्पना
शासनाने १ जुलै रोजी ‘एकच लक्ष, दोन कोटी वृक्ष’ ही संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी मोबाईलवर ‘सेल्फी विथ ट्री’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. वृक्षारोपणाचा सेल्फी वनविभागाच्या वेबसाईटवर डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान केले जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.
वृक्ष लागवडस्थळी अचानक भेट देणार
राज्यात वृक्ष लागवडस्थळी अचानक भेट देणार असल्याची कबुली ना. मुनगंटीवार यांनी दिली. त्यामुळे वृक्षलागवड हा कागदोपत्री उपक्रम समजू नये. कुणी अधिकाऱ्यांनी यात कुचराई अथवा हयगय के ल्यास कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसहभागातून ‘ग्रीन आर्मी’ हे लक्ष असून राज्यात २२ संस्थांचा मोलाचा वाटा राहील, असेही ते म्हणाले.