...मगर जाने का नही; एसटी आंदोलनकर्त्यांचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 05:00 IST2021-12-15T05:00:00+5:302021-12-15T05:00:57+5:30
विलिनीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी तब्बल ३६ दिवसांनंतरही संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आदी कारवाया सुरू केल्या. कारवाईमुळे संप चिघळण्याचे चित्र आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अल्टिमेटमची मुदत १३ डिसेंबर रोजी संपली. दोन कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळला, तर इतर संपकरी पुन्हा सेवेत दाखल झाले नाहीत.

...मगर जाने का नही; एसटी आंदोलनकर्त्यांचा पवित्रा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी १३ डिसेंबरचा एसटी प्रशासनाचा अल्टिमेटम धुडकावून लावत कर्मचारी संपावर ठाम आहेत.
विलिनीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी तब्बल ३६ दिवसांनंतरही संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आदी कारवाया सुरू केल्या. कारवाईमुळे संप चिघळण्याचे चित्र आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अल्टिमेटमची मुदत १३ डिसेंबर रोजी संपली. दोन कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळला, तर इतर संपकरी पुन्हा सेवेत दाखल झाले नाहीत. आतापर्यंत विभागात २,४४४ कर्मचाऱ्यांपैकी ३४६ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा भरणा जास्त आहे.
दरम्यान, सोमवार व मंगळवारी अमरावती आगारातून केवळ १२ बस मार्गस्थ झाल्या. त्यामध्ये २४ फेऱ्या लाल परीने केल्या आहेत. संपाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत परिस्थिती अशीच राहील, असे बोलले जात आहे.
विलिनीकरणाची प्रमुख मागणी मान्य होत नाही तोपर्यंत कामावर परतणार नाही. कारवाईची तमा आम्ही बाळगणार नाही. आम्ही मागणीवर आजही ठाम आहोत.
- संजय मालवीय, एसटी कर्मचारी
एसटी कर्मचारी अन्याय सहन करीत आहेत. आता आरपारची लढाई लढत आहोत. कितीही विनंती केली तरी मागणी पूर्ण होईस्तोवर आमचा लढा चालूच राहील.
- सतीश कडू, एसटी कर्मचारी
संपाचा ३६ वा दिवस
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी विभागातील आठ आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा १४ डिसेंबर हा ३६ दिवस आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले.